संजय शिरसाट नोटीस पाठवा, वकिलांना पेमेंट मी करतो; माजी खासदार इम्तियाज जलील यांचे गंभीर आरोप

Imtiaz Jaleel On Sanjay Shirsat : राज्याचे मंत्री आणि शिवसेना नेते संजय शिरसाट यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) अनेक गंभीर आरोप करत आहे. त्यांनी मंत्री शिरसाट यांच्यावर बेकायदेशीररित्या मालमत्ता खरेदी, एमआयडीसीतील भूखंड आणि सरकारी जमीनीमध्ये घोटाळा असे अनेक गंभीर आरोप केले आहे. तर या आरोपांना प्रत्युत्तर देत मी इम्तियाज जलील यांना कायदेशीर नोटीस पाठवणार असं शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी म्हटले होते. तर आता संजय शिरसाट यांनी मला नोटीस पाठवावे मी वकिलांची फी देतो असा टोला जलील यांनी लावला आहे. इम्तियाज जलील यांनी आज पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा मंत्री शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.
इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेत संजय शिरसाट यांनी आपल्या मुलांच्या नावे सहाजापूर येथे दहा एकर वर्ग दोनची जमीन खरेदी केल्याचा आरोप केला होता तसेच त्या संदर्भातील पुरावे देखील त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिले होते. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी हरिजन असा उल्लेख केला होता. यावरुन संभाजीनगरमधील विविध पोलीस ठाण्यात जलील यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र पोलीस संजय शिरसाट यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये माजी खासदार जलील यांनी केला आहे.
या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना माजी खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, माझ्या विरोधात अनेक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. मात्र पोलिसांनी शहानिशा न करता माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस नेत्यांचे गुलाम झाले आहेत. या प्रकरणात मी आता उच्च न्यायालयात जाणार आहे. या प्रकरणात पोलीस आयुक्त आणि संबंधित अधिकारी यांना न्यायालयात खेचणार असा इशारा जलील यांनी या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिला. तसेच ज्या हरिजन शब्दाच्या उल्लेखामुळे आपल्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो शब्द सरकारी कागदावर देखील नमूद करण्यात आला आहे. मी तो फक्त वाचून दाखवला, जर माझ्यावर गुन्हा दाखल केला तर मग जिल्हाधिकारी, महसूल विभाग आणि सरकारवरही गुन्हा दाखल करा अशी मागणी देखील जलील यांनी यावेळी केली.
लोकांचा माझ्यावर विश्वास : माजी खासदार जलील
शिरसाट यांनी जिल्हाधिकारी यांच्यावर दबाव टाकून वर्ग 2 ची जमीन बळकावली आहे. एवढ्या दिवसांत संजय शिरसाट यांनी एका प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही. लोकांचा माझ्यावर विश्वास आहे. मी लोकांचा बोलवत धनी असेल, पण या लोकांचा विश्वास आहे की मी मुद्दा सोडणार नाही. तुम्ही पोलिसांवर दबाव टाकून इम्तियाज जलील गप्प बसेल असे तुम्हाला वाटत असेल तर मी गप्प बसणार नाही. मी नोटीसच्या धमक्यांना मी घाबरत नाही.
प्रेमाचा त्रिकोण अन् भयंकर हत्याकांड; प्रियकर गुजरातहून आला थेट पुण्यात आला, तरूणाला भोसकलं…
यापूर्वी देखील अशाच एका मंत्र्यांना नोटीस पाठवणार असल्याचे सांगितले होते. मी शिरसाट यांना 38 तासांची मुदत देतो, तुमच्या वकीलची फी देखील मी देतो, पण तुम्ही नोटीस पाठवाच, नाहीतर मीच त्यांना कोर्टात खेचून घेऊन जाणार आहे. असा इशारा देखील माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मंत्री शिरसाट यांना दिला.