इम्तियाज जलील यांनी मंत्री संजय शिरसाटांची काढली कुंडली; वाचा, A टू Z स्टोरी

Imtiaz Jaleel Vs Sanjay Shirsat : एमआयएमचे नेते आणि छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पुन्हा एकदा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. (Shirsat) शिरसाट यांनी कमी किमतीने शहरातील जिल्हा न्यायालयासमोर जबिंदा नावाच्या बिल्डरकडून बारा हजार स्क्वेअर फुटांचा प्लॉट फक्त 4800 प्रति प्रति स्क्वेअर फुटाणे घेतल्याचा आरोप जलील यांनी केला आहे. या आरोपामुळं राजकारण तापलं आहे.
हा प्लॉट मुलगा सिद्धांत शिरसाट आणि पत्नी विजया शिरसाट यांच्या नावावर केल्याचा आरोपही इम्तियाज जलील यांनी यावेळी केला आहे. त्यासोबतच, शिरसाट यांनी विट्स हॉटेलच्या खरेदीत पाच सहकारी कोण आहेत, हे त्यांनी सांगितलेलं नाही. MIDC मधील प्लॉटच्या खरेदीसंदर्भातही ते बोलले नाहीत. तसंच, शिरसाट यांचे त्र्यंबकेश्वरमध्ये हॉटेलचे काम सुरू आहे. मी तिथे जाऊन त्या हॉटेलचं काम बघणार आहे. शिरसाट यांनी मागच्या महिन्यात परिवाराच्या नावावर कोट्यवधीची जमीन घेतली असल्याचा आरोपही जलील यांनी केला आहे.
वर्ग 2 ची जमीन आणि हरीजनांना दिलेल जागा हस्तांतरीत केली जाऊ शकत नाही. शाजापूर येथील गट क्रमांक 8 मधील 10 एकर जागा संजय शिरसाट यांनी त्यांच्या मुलाच्या नावावर घेतली. या जागेत एक वृत्तपत्र संपादक आणि एक माजी पोलीस अधिकारी त्या ठिकाणी प्लॉटिंग करत आहेत. सिद्धांत आणि तुषार शिरसाट या दोन मुलांच्या नावावर एक कोटी दहा लाख रुपयांत जमीन घेतली गेली. लक्ष्मण भिका बनसोडे यांच्या नावावर ही जमीन होती. हा गरीब हरिजन शेतकरी असावा. पालकमंत्री एवढे गरीब आहेत का? की ते सरकारी जमीन सोडत नाहीयेत, असा सवालही जलील यांनी केला आहे.
मंत्री संजय शिरसाटांचा विट्स हॉटेल खरेदीबद्दल मोठा निर्णय; वाचा, कुठं अन् कसं आहे हे हॉटेलं?
या जागेची चौकशी केली तर मी जे बोलतो ते सगळे सत्य असल्याचं समोर येणार आहे. त्यावेळी एक महिला तहसीलदार होती. तिच्यावर दबाव आणण्यात आला होता. बागडे नावाचे तलाठी जे अनेकदा सस्पेंड झाले आहेत, त्याला सेवेत घेऊन त्याला एक महिन्याची पोस्टिंग दिली गेली. तहसीलदार यांच्याकडून बळजबरी शिक्का घेण्याचा प्रयत्न केला गेला. त्यासाठी रमेश मूनलोड या तहसीलदारांनी मदत केली. त्यानंतर ही जमीन एक कोटी दहा लाखमध्ये सिद्धांत शिरसाट आणि तुषार शिरसाट या संजय शिरसाट यांच्या मुलांच्या नावावर करण्यात आली, असा खळबळजनक आरोप जलील यांनी केलाआहे.
दुसरे प्रकरण हे जालना रोड अदालत समोरील आहे. येथे 12 हजार स्क्वेअर फूट जागा सिद्धांत शिरसाट मुलगा, विजया शिरसाट यांच्या नावावर घेतली. जबिंदा बिल्डर कडून ही जागा घेण्यात आली. ही जागा 2025 मध्ये घेण्यात आली. ही जागा पाच कोटी 83 लाख 94 हजार रुपयात घेतली गेली. 4800 रुपये प्रति स्क्वेअर फूट किंमतीने ही जागा घेण्यात आली. मी आयुष दवाखान्यासाठी जमीन मागितली होती, पण उपलबद्ध नसल्याचे सांगण्यात आले, असा गंभीर आरोप जलील यांनी केला.
शाजापूर येथील गट नंबर 34 मध्ये दोन गुंठे जागा सिद्धांत शिरसाट यांच्या नावावर घेतली गेली. ही जागा एक कोटी रुपयांमध्ये मध्ये घेतली गेली. सप्टेंबर 2024 मध्ये 2 एकर जागा साठ लाखात घेतली. ही जागा विजया शिरसाट यांच्या नावावर घेतली गेली. या 34 गट नंबरमध्ये एक मोठ्या हॉटेलचे काम सुरू आहे. त्या हॉटेलचे काम सुरू असताना कुठलीही रॉयल्टी न काढता मुरूम काढला जात आहे. कसाब खेडा, तिसगाव आणि धरमपूर या गावाच्या हद्दीतून मुरूम काढला जात आहे, असा आरोप करून जलील यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी नेमली पाहिजे, अशी मागणी जलील यांनी केली. आता जलील यांच्या या सर्व आरोपांना शिरसाट काय उत्तर देतात हे पाहण महत्वाचं आहे.