Sharad Pawar : ‘हा प्रकार खूप वाईट अन् वेदनादायी’; पवारांनी ट्विट करत अमित शहांनाही सुनावलं

Sharad Pawar : ‘हा प्रकार खूप वाईट अन् वेदनादायी’; पवारांनी ट्विट करत अमित शहांनाही सुनावलं

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दोन दिवसांपूर्वी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यानंतर कार्यकर्ते पदाधिकारी त्यांना हा निर्णय मागे घेण्यासाठी विनंती करत आहेत. त्यांनी हा निर्णय घेतला असला तरी राजकारणातून संन्यास घेतलेला नाही. आजही ते देशभरातील विविध घडामोडींवर आपली रोखठोक मते मांडत आहेत. देशातील एका मोठ्या घटनेवर पवार यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना टॅग केले आहे.

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलक पैलवानांचे आंदोलन अजूनही सुरुच आहे. आंदोलक महिला कुस्तीपटू यांच्या समर्थनार्थ दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला होता. मात्र, या मोर्चातील विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

या घडामोडींवर पवार यांनी ट्विट केले. दिल्लीत ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंनी जो आक्रमक पवित्रा घेतला आहे, त्याला दिल्लीतील कॉलेजच्या विद्यार्थीनींनी पाठिंबा व्यक्त करण्यासाठी रॅली काढली. त्या रॅलीला दडपण्यासाठी पोलिसांनी त्या विद्यार्थीनींशी केलेले वर्तन अतिशय चुकीचे आहे. असे प्रकार खूप वेदनादायी आणि वाईट आहेत. शांतपणे आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या अत्याचाराचा जाहीर निषेध. मी वैयक्तिकरित्या गृहमंत्र्यांना आवाहन करतो की आता त्यांनीच या प्रकरणात लक्ष द्यावे.

दरम्यान, या प्रकरणी काल रात्री दिल्ली पोलीस आणि कुस्तीपटूंत हाणामारी झाल्याचे समजते. यामुळे येथील वातावरण अधिकच चिघळले आहे. महिला कुस्तीपटूंना शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. ब्रिजभूषण सिंह यांना अटक करण्याच्या मागणीवर आंदोलक ठाम आहेत. या मुद्द्यावर विरोधी पक्षांकडून सरकारला धारेवर धरले जात आहे. विरोधी पक्षांचे नेते आंदोलकांना भेटण्यासाठी येत आहेत.

निवृत्तीच्या निर्णयावर पवार म्हणाले… येत्या 2 दिवसात अंतिम निर्णय घेऊ

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube