Sharad Pawar : कांदा प्रश्नी शरद पवारांनी दिला केंद्र सरकारला सल्ला म्हणाले…
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. विधिमंडळामध्ये देखील विरोधकांनी सत्ताधाऱ्यांनी कांदा प्रश्नी घेरल्याचं पाहायला मिळालं होत. यावेळी कांदा हे जिरायती शेतकऱ्यांचे पीक आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत. कांदा निर्यात चालू केली पाहिजे असे स्पष्ट करत मी आणि माझे सहकारी या प्रश्नांवर दिल्लीत आवाज उठविणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिली होती. त्यानंतर आता पुन्हा त्यांनी कांदा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारला एक सल्ला दिला आहे. ते एका पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
यावेळी शरद पवार म्हणाले की, ‘मी नुकतचं अहमदनगर आणि नाशिक येथे जाऊन आलो. शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी कांदा प्रश्नी गंभीर तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारने नुकसान होणाऱ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी अर्थिक मदत करावी. तसेच राज्य सरकार, केंद्र सरकारने आणि केंद्र सराकरची नाफेड एजन्सी यांनी कांदा निर्यातीचा मोठा कार्यक्रम राबवावा. कोणत्याही भागात निर्यातीा बंधन असता कामा नये.’ असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केंद्र सरकारला दिला आहे.
दरम्यान शुक्रवारी पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त पारनेर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, माजी आमदार दादा कळमकर, आमदार निलेश लंके उपस्थित होते.
आधी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करा, कांदाप्रश्नी अंबादास दानवे आक्रमक
याबरोबर त्यांनी त्यांच्या कृषिमंत्री असतानाच्या काळातील एक किस्सा ऐकवला. पवार म्हणाले, की ‘मी केंद्रात कृषिमंत्री असताना दिल्लीत कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. त्यावेळी भाजपचे काही खासदार गळ्यात कांद्याच्या माळा घालून आले. मी त्यांना विचारले, की तुम्ही माळा का घातल्या आहेत ?,’ त्यावर त्यांनी सांगितले की आम्ही कांदा भाववाढीचा निषेध करण्यासाठी आलो आहोत. त्यानंतर हे खासदार सभागृहात कांद्याच्या माळा घेऊन उभे राहिले.
त्यावर सभापतींनी मला या प्रश्नावर मार्ग काढण्यास सांगितले. जो काही मार्ग काढताल त्याची माहिती सभागृहात देण्यास सांगितले. त्यावर मी मात्र त्यांना स्पष्ट शब्दांत या प्रश्नावर काहीच तोडगा काढणार नाही असे सांगितले. ‘कांदा हा जिरायत शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. कधी नव्हे ते त्यांना पैसे मिळत आहे. त्यामुळे त्यांचे नुकसान होईल असा कोणताही निर्णय मी घेणार नाही’ असे निक्षून सांगितले.
याच खासदारांना मी विचारले, की ‘तुम्ही जे अन्न खाता त्यात कांदा किती आहे ?, कांद्याचा खर्च किती आहे ?, ते सांगा ?, ‘दैनंदिन अन्नात कांद्याचा खर्च हा नेहमीच अतिशय कमी असतो असे सांगत आज कांद्याचे भाव पडलेले असताना हे आंदोलन करणारे लोक त्याकडे पहायलाही तयार नाहीत,’ अशा शब्दांत पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
ते पुढे म्हणाले, की ‘एक एकर कांद्यासाठी बि बियाणे, नांगरणी, मशागत यांसाठी एकूण सत्तर हजारांचा खर्च येतो. एका किलोला आठ ते दहा रुपये खर्च येतो. त्याचा भाव जर तीन ते चार रुपये मिळत असेल तर त्या शेतकऱ्याने काय करायचे ?,’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ‘या संकटातील शेतकऱ्यांनी खरच मदत करायची असेल तर तत्काळ कांद्याची निर्यात चालू करावी.’ तसेच शेतकरी कसा वाचेल यासाठी सरकारने ठोस प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.