Video :प्रदेशाध्यक्ष होताच शशिकांत शिंदेंना आर आर आबांची आठवण; म्हणाले, मी त्यांच्याप्रमाणेच लढणार अन्…

Video :प्रदेशाध्यक्ष होताच शशिकांत शिंदेंना आर आर आबांची आठवण; म्हणाले, मी त्यांच्याप्रमाणेच लढणार अन्…

Shashikant Shinde New President NCP : गेली अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चेला अखेर पुर्णविराम मिळाला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत अखेर खांदेपालट झाली आहे. आत्तापर्यंतच्या काळात सर्वाधिक काळ (NCP) अध्यक्ष राहिलेले जयंत पाटील पायउतार झाले असून शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. या नियुक्तीनंतर शिंदे यांनी आपले विचार आयोजीत कार्यक्रमात व्यक्त केले.

पक्षामध्ये अनेक दिग्गज नेते पात्र असतानाही मला प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळाली. या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करणार. सर्वसामान्य नेत्याला संधी मिळाल्यावर कसं काम करता येतं हे आर आर पाटलांनी दाखवून दिलं. मी देखील आर आर पाटलांप्रमाणे काम करणार. शासनाच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवणार, वेळ पडल्यास रस्त्यावर उतरणार. राष्ट्रवादीचा पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये सत्तेत आणण्यासाठी दिवसरात्र कष्ट करणार असा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवला आहे.

ब्रेकिंग : पवारांनी भाकरी फिरवलीच; शशिकांत शिंदे पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष

आज शरद पवार आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी, सर्व पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र प्रदेश शरद पवार गटाचा अध्यक्ष केल्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो, अशा भावना यावेळी शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केल्या. तसंच आपल्या सर्वांच्या वतीने मी महाराष्ट्राच्या जनतेला ग्वाही देतो की, ज्या नेत्याने महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेसाठी अहोरात्र कष्ट केले त्या नेत्याचा एक कार्यकर्ता म्हणून मी महाराष्ट्रातील अनेक प्रश्नांना, अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न मी करेन. या काळात पक्षसंघटना वाढवण्यासाठी प्रयत्न करेन. पक्षाला सत्तेत आणण्यासाठी मी दिवसरात्र कष्ट करेन, अशी ग्वाहीही त्यांनी जनतेला दिली.

शशिकांत शिंदेंपुढे मोठे आव्हान

आगामी काळ शशिंकात शिंदे यांच्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. त्यामुळे तो काळ आव्हानात्मक असणार आहे. यावरही त्यांनी भाष्य केलंय. अगोदरचे राजकारण वेगळे होते. आताच्या राजकारणाची पद्धत वेगळी आहे. अगोदर राजकीय नेते जनतेचे प्रश्न उपस्थित करायचे आणि सत्ताबदल व्हायचा आता मात्र सत्ताबदल अधिकाराच्या मदतीने, यंत्रणेच्या मदतीने, आमिष दाखवून केला जातो असं म्हणत शिंदे यांनी थेट भाजपवर वार केला आहे.

या बदललेल्या राजकारणाबाबत लोकांत जागृती करण्याचा मी प्रयत्न करेन. राज्यभर दौरा करत असताना मी पक्षसंघटना मजबूत करण्याचा प्रयत्न करेन, असेही यावेळी शशिकांत शिंदे यांनी सांगितले. दरम्यान मी पक्षाला सत्तेत आणण्यासाठी दिवसरात्र कष्ट करणार आहे, अशी ग्वाहीही शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे आता शरद पवारांनी भाकरी फिरवल्यामुळे भविष्यात पक्ष सत्तेत येऊन नवा इतिहास घडणार का? याकडं सर्वांचेच लक्ष लागले आहे.

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube