एक लाख पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय; रोहित पवारांचा शिंदे सरकारला इशारा

एक लाख पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय; रोहित पवारांचा शिंदे सरकारला इशारा

मुंबई : राज्य सरकारने बाह्ययंत्रणेच्या अर्थात आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून आतापर्यंत चार विभागांतील 11 हजार 203 जागांवर कंत्राटी भरतीचे निर्णय जाहीर केले आहेत. तर नोव्हेंबरपर्यंत याच पद्धतीने एक लाख पदे भरण्यात येणार आहेत, असे वृत्त लोकसत्ता वृत्तपत्राने दिले आहे. याच वृत्तावरुन राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांनी काही ठराविक व्यक्तींच्या जवळच्या कंपन्यांना कंत्राट देण्यासाठी कंत्राटी भरतीच्या नावाखाली सुरु असलेला हा नवा गोरखधंदा शासनाने त्वरित थांबवावा. अन्यथा राज्याचा युवा वर्ग शांत बसणार नाही, हे शासनाने लक्षात असू द्यावं, असं म्हणतं शिंदे सरकारला इशारा दिला आहे. (Shinde government’s decision to fill one lakh posts on contractual basis till November)

काय म्हंटलं आहे वृत्तात :

राज्य सरकार वर्ग 2,3 आणि 4 च्या 186 संवर्गातील सर्व पदे कंत्राटी पद्धतीने भरणार आहे. सुरुवातीला इतर मागास बहुजन कल्याण विभागातील 821 जागांवर कंत्राटी भरतीचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानंतर वैद्याकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागात तब्बल पाच हजार 56 पदे, सार्वजनिक बांधकाम विभागातील दोन हजार 326 पदेही बाह्ययंत्रणेच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेतील तीन हजार पदे भरण्याचा शासन निर्णय प्रसृत केला आहे. दहा दिवसांत चार विभागांचे शासन निर्णय जाहीर झाले असून, 11 हजार २०३ पदे भरली जाणार आहेत.

मुंबईच्या एन्ट्री पॉईंटवरील टोलनाक्यांवर आता ‘ठाकरें’चा वॉच; मनसेचे कॅमेरे ठेवणार लक्ष

नोव्हेंबरपर्यंत जवळपास एक लाख शासकीय पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यात गृह व नियोजन विभागामध्ये जवळपास पाच हजार पदे, जलसंपदा विभागामध्ये आठ हजार, महसूल विभागात तीन हजार, कृषी विभागामध्ये तीन हजार, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामध्ये चार हजार, वन विभागामध्ये पाच हजार, शालेय शिक्षण विभागात सहा हजार, आदिवासी विभागामध्ये दोन हजार, ग्रामविकास विभागात पाच हजारांवर पदे, उच्च व तंत्रशिक्षण विभागामध्ये सहा हजारांवर पदांचा समावेश आहे. याशिवाय उत्पादन शुल्क, सहकार आदी विभागांमध्येही कंत्राटी भरती केली जाणार आहे.

रोहित पवारांचा राज्य सरकारला इशारा :

धडाकेबाज कंत्राटी सरकारने कंत्राटी भरतीचा धडाकाच लावला असून गेल्या दहा दिवसात तब्बल 11 हजार पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचे निर्णय झाले आहेत. नोव्हेंबर पर्यंत एक लाख पदे कंत्राटी पद्धतीने भरले जाण्याचा अंदाज आहे.

एकीकडे सरकारी नोकरीचं स्वप्न उराशी बाळगून राज्यातील लाखो युवांनी सरकारी भरतीसाठी जीवापाड मेहनत करत अभ्यास करायचा आणि दुसरीकडे या सिरीयस नसलेल्या शासनाने मात्र शासकीय खर्च वाचवण्याच्या नावाखाली कंत्राटी भरती करून युवा वर्गाचं भविष्य अंधकारमय करायचं,  हे योग्य नाही. 

काही ठराविक व्यक्तींच्या जवळच्या कंपन्यांना कंत्राट देण्यासाठी कंत्राटी भरतीच्या नावाखाली सुरु असलेला हा नवा गोरखधंदा शासनाने त्वरित थांबवावा. अन्यथा राज्याचा युवा वर्ग शांत बसणार नाही, हे शासनाने लक्षात असू द्यावं, असं रोहित पवार म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube