शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला घरचा आहेर; संजय राऊतांच्या सख्ख्या भावाची फेसबूक पोस्टद्वारे थेट टीका
Sandip Raut FB Post On Shov Sena UBT : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये (UBT) दारुण पराभव झाल्यानंतर खडबडून जाग आलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकींची सत्रं सुरु झाली आहे. स्वत: उद्धव ठाकरेंनी यामध्ये पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळत आहे. असं असतानाच संजय राऊतांच्या भावाने पक्षाला घरचा आहेर दिला आहे. त्यांच्या या पोस्टची सगळीकडे जोरदार चर्चा आहे.
काय म्हटलं आहे पोस्टमध्ये?
संजय राऊत यांचे सख्खे बंधू असलेले संदीप राऊत हे कार्यकर्त्यांमध्ये अप्पा राऊत म्हणून ओळखले जातात. 10 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास संदीप राऊथ यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन एक पोस्ट करण्यात आली. या पोस्टमध्ये शिवसेना ठाकरे गटात एकनिष्ठ शिवसैनिकांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. नेत्यांच्या पुढं पुढं करणाऱ्यांनाच पक्षात पद मिळत असल्याचा आरोपही या पोस्टमध्ये केल्याचं दिसत आहे. संदीप राऊत हे भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी असून, त्यांच्या या पोस्टचा रोख नेमका कोणाच्या दिशेनं आहे याबद्दलच्या उलट-सुलट चर्चा सुरु आहेत.
एकनाथ शिंदेंचा काळ संपला, पक्षही फुटू शकतो; संजय राऊतांनी दिला इशारा
अलिकडे पक्षाशी एकनिष्ठ आणि प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या पारंपारिक शिवसैनिकांपेक्षा नेत्यांच्या पुढे पुढे करणाऱ्या नवं उतावीळांनाच डोक्यावर घेतलं जातंय, असं या पोस्टमध्ये संदीप राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान, एकीकडे संदीप राऊत यांची पोस्ट चर्चेत असताना त्यांनी ज्या दिवशी पोस्ट केली त्याच दिवशी ‘मातोश्री’वर एक महत्त्वाची बैठक पार पडली. उद्धव ठाकरेंनी मंगळवारी ‘मातोश्री’वर घेतलेल्या नेत्यांच्या बैठकीमध्ये ‘मिशन मुंबई’अंतर्गत काही सूचना केल्या. हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेने मुंबई महापालिका निवडणुकीत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्याचं या बैठकीमध्ये ठरलं आहे.
पक्षाने हिंदुत्वाचा मुद्दा सोडला अशा प्रकारचा अपप्रचार विरोधकांकडून केला जात आहे. त्याला योग्य प्रतिवाद केला जाणार असल्याचं निश्चित करण्यात आलं आहे. तसंच, विधानसभा निवडणुकीत ज्या प्रभागात ठाकरे गट तसंच महाविकास आघाडीचा उमेदवार पिछाडीवर आहे, तिथे अधिक लक्ष दिले जाणार आहे. पक्ष सोडून शिंदे गटात गेलेल्या माजी नगरसेवकांच्या प्रभागात पर्यायी प्रबळ उमदेवाराला ताकद देण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. महायुती सरकार कशाप्रकारे मुंबईतल्या मोकळ्या जमिनी अदानींच्या घशात घालत आहे हे जनतेपर्यंत नेण्याचंही या बैठकीमध्ये निश्चित करण्यात आलं आहे.