माळेगाव कारखान्या’च्या चेअरमनपदी निवड होताच अजित पवार अपात्र?, विरोधकांचा आक्षेप काय?

माळेगाव कारखान्या’च्या चेअरमनपदी निवड होताच अजित पवार अपात्र?, विरोधकांचा आक्षेप काय?

Ajit Pawar as the Chairman of Malegaon Factory : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज (5 जुलै) माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी निवड झाली. तर संगीता कोकरे यांची व्हाईस चेअरमनपदी निवड झाली. आज कारखान्याच्या संचालक मंडळाची विशेष बैठकीत बोलवण्यात आली होती. (Malegaon) या बैठकित एकमतानं ही निवड करण्यात आली. यानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. मात्र, विरोधी पॅनलच्या नेत्यांनी ही निवड नियमविरोधी असल्याची टीका केली आहे.

निळकंठेश्वर पॅनल 

काही दिवसांपूर्वीच माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत अजित पवार यांच्या ‘श्री निळकंठेश्वर पॅनल’ने 21 पैकी 20 जागांवर दणदणीत विजय मिळवत वर्चस्व सिद्ध केलं. तर, दुसरीकडे, प्रमुख विरोधक चंद्रराव तावरे यांच्या ‘सहकार बचाव पॅनल’ला केवळ एक जागा मिळवता आली. शरद पवार गटाच्या पाठिंब्यानं एक पॅनल, तसंच अपक्ष गटाचं एक पॅनलदेखील मैदानात होतं. अशा स्थितीत विरोधी पॅनलची मतं विभागली गेली. त्यामुळे अजित पवार यांच्या पॅनलला सहज विजय मिळवता आला.

माळेगाव कारखान्याचे कारभारी अजितदादा! 21 पैकी 20 जागा जिंकल्या, काकांच्या पॅनलचा सुपडा साफ

उपमुख्यमंत्री माळेगाव कारखान्याच्या चेअरमनपदी विराजमान झाले. पण या निवडीवर विरोधी पॅनल अर्थात सहकार बचाव पॅनेलचे प्रमुख नेते चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी या निवडीला नियमविरोधी म्हटलं आहे. “अजित पवार ‘ब वर्ग’ सदस्य म्हणून निवडून आले आहेत, तरी त्यांनी चेअरमनपद स्वीकारलं आहे, जे सहकार विभागाच्या नियमाविरोधात आहे. त्यामुळे ही निवड बेकायदेशीर आहे,” असा आरोप तावरेंनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांकडं तक्रार दाखल केल्याचंही सांगितलं.

ऊस पुरवठा केलेला नाही

त्याचबरोबर, अजित पवार यांनी कधीही कारखान्याला ऊस पुरवठा केलेला नाही, मग अशा व्यक्तीला चेअरमन करण्यामागं नेमकं कोणतं तत्त्वज्ञान आहे, असा सवालही तावरे गटानं उपस्थित केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निवडणुकीला राजकीय प्रतिष्ठेचं स्वरूप दिलं होतं. प्रचाराच्या काळात त्यांनी दररोज 4 ते 5 सभा घेऊन स्वतःच्या पॅनलसाठी जनतेचा पाठिंबा मिळवला. त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनलच्या यशानं माळेगाव कारखान्यावर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा ठसा उमटवला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube