CDR दमानियांकडे येतात तरी कुठून? विरोधकांना नाकारली जाणारी माहिती त्यांच्यापर्यंत कशी पोहोचते, सुषमा अंधारेंचा गंभीर सवाल
अंजली दमानिया यांनी सीडीआर डेटा उघड केला की चांगली बाब असली तरी हा डेटा त्यांच्यापर्यंत पोहोचतो कसा, हा मोठा प्रश्न आहे.
Sushma Andhare’s serious question : अशोक खरात प्रकरणात आता राजकीय आरोप प्रत्यारोप अधिक तीव्र होताना दिसत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोबाईल फोनचे सीडीआर रेकॉर्ड बाहेर काढल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अंधारे म्हणाल्या की, अंजली दमानिया यांनी सीडीआर डेटा उघड केला की चांगली बाब असली तरी हा डेटा त्यांच्यापर्यंत पोहोचतो कसा, हा मोठा प्रश्न आहे.
विरोधक वारंवार मागणी करून देखील त्यांना सीडीआर मिळत नाहीत, मग दमानियांना ही माहिती कोण पुरवत आहे, असा सवाल त्यांनी केला. अंधारे यांनी पुढे सांगितले की, दमानिया यांनी दावा केला आहे की, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी अशोक खरात यांना 17 कॉल केले होते. मात्र, या कॉल्सचे पूर्ण तपशील, इनकमिंग-आऊटगोईंग रेकॉर्ड, कॉलची वेळ आणि कालावधी सार्वजनिक होणे गरजेचे आहे. या प्रकरणाचा रोख एकनाथ शिंदे यांच्या दिशेने वळवला जात असल्याचं देखील त्यांनी सूचित केलं.
याचबरोबर त्यांनी भाजपवर देखील अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. अशोक खरात यांच्या ईशान्येश्वर मंदिराला पर्यटन स्थळाचा दर्जा देणे, तसेच सुशोभीकरणासाठी निधी मंजूर करणे यामध्ये ज्यांचा सहभाग होता, त्यांच्या कॉल रेकॉर्डचा उल्लेख का नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दमानिया यांनी सादर केलेल्या सीडीआरमध्ये भाजपच्या कोणत्याही नेत्याचे नाव नसल्यामुळे संशय अधिक बळावतो, असे अंधारे म्हणाल्या. तपास यंत्रणेवर देखील अंधारे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एसआयटीकडून इतके दिवस उलटून देखील कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.
अशोक खरात यांच्या सीडीआरसह त्यांच्या संपत्तीची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केलेल्या घोषणेनंतर देखील काही संबंधित व्यक्तींवर कारवाई का झाली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, रुपालीचाकणकर यांच्याबाबतही अंधारे यांनी संशय व्यक्त केला. चौकशीचे समन्स निघाल्याचा चर्चेनंतर तीन दिवस मौन बाळगून अचानक त्यांनी प्रतिक्रिया दिली. या काळात त्यांनी तपास यंत्रणांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला का, असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला.
अंधारे यांनी शेवटी गंभीर आरोप करत म्हटले की, अंजली दमानिया वारंवार सरकारी गोपनीय माहिती बाहेर काढत आहेत, तर दुसरीकडे एसआयटीकडून कोणतीही माहिती समोर येत नाही. त्यामुळे या प्रकरणाचा उद्देश सत्य बाहेर आणणे नसून काही विशिष्ट व्यक्तींना लक्ष करणे आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. या सर्व प्रकरणात सर्वात महत्वाचे म्हणजे पीडित महिलांना न्याय मिळणे, असे सांगत अंधारे यांनी केवळ एका व्यक्तीला लक्ष करून चालणार नाही, तर संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे असल्याचे ठामपणे मांडले.