लोणावळा परिसरात कलम 163 लागू; धबधबे, किल्ले व पर्यटनस्थळी 31 ऑगस्टपर्यंत निर्बंध
लोणावळा परिसरातील अन्य पर्यटनस्थळांवर विविध प्रकारच्या धोकादायक कृत्यांवर बंदी घालण्यात आली आहे.
पावसाळ्यात लोणावळा परिसरातील (Rain) पर्यटनस्थळांवर मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत असल्याने संभाव्य अपघात टाळण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) २०२३ मधील कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. हे आदेश ६ जुलै ते ३१ ऑगस्ट २०२६ दरम्यान दररोज सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.
या आदेशानुसार भुशी धबधबा, लोहमगड, विसापूर, तिकोणा, तुंग किल्ला, टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट, पवना धरण तसेच परिसरातील अन्य पर्यटनस्थळांवर विविध प्रकारच्या धोकादायक कृत्यांवर बंदी घालण्यात आली आहे. वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरून पोहणे, धबधब्याखाली जाणे, कड्यांवर किंवा धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणे, मद्यपान करून वावरणे, धोकादायक वाहनचालक, भरधाव वाहन चालवणे, ओव्हरटेक करणे, महिलांची छेडछाड, मोठ्या आवाजात डीजे किंवा स्पीकर वाजवणे तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा व प्लास्टिक टाकणे यावरही मनाई करण्यात आली आहे.
Maharashtra Rain : लोणावळ्यातील पर्यटनावर 31 ऑगस्टपर्यंत निर्बंध; आदेश निघाले
याशिवाय धबधबे, धरणे आणि नदी परिसरात दुचाकी, चारचाकी व सहाचाकी वाहनांच्या प्रवेशावरही बंदी घालण्यात आली आहे. पावसाळ्यातील अपघातांची वाढती शक्यता, वाहतूक कोंडी आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाने पर्यटकांना नियमांचे पालन करून सुरक्षित पर्यटन करण्याचे आवाहन केले असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता व अन्य लागू कायद्यांनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही दिला आहे.
लोणावळ्यासह मावळ तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. मळवली जवळील पाटण गावात एका घरावर दरड कोसळल्याने तिघा जणांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. मळवली परिसराला समुद्राचं स्वरुप प्राप्त झालं असून इथल्या घरे आणि बंगल्यात दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी गेल्याने हाहाःकार उडाला आहे. लोणावळ्यात आतापर्यंत इतिहासातील सर्वात जास्त म्हणजे सुमारे ६२५ मिलीमीटर पावसाची विक्रमी नोंद झाली आहे.