Thackeray Vs Shinde : पक्षफुटीवरच प्रश्नचिन्ह असताना बहुमत चाचणीचा निर्णय का?
सुप्रीम कोर्टातील राज्यातील सत्तासंघर्षावर आजपासून पुन्हा सलग सुनावणी सुरु झाली आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात सुनावणी सुरु होत आहे. ठाकरे गटाचा युक्तिवाद आज पूर्ण झाला. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. लंच ब्रेकनंतर शिंदे गटाकडून युक्तिवाद करण्यात आला. शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकील हरिश साळवे, अॅड. नीरज किशन कौल, अॅड. मनिंदर सिंग आणि महेश जेठमलानी युक्तिवाद करतील. शिंदे गटाच्या युक्तिवादाची सुरुवात कौल यांनी केली.
कौल यांनी युक्तिवाद करताना ही राजकीय पक्षात नाही तर विधिमंडळ पक्षात फूट पडली आहे हे कोण ठरवेल, असा प्रश्न उपस्थित केला. ते पुढे म्हणाले की राजकीय पक्ष हे विधिमंडळ पक्षाशी जोडलेले असतात. एका पक्षासोबत निवडणूक लढवली पण दुस-या पक्षासोबत सरकार स्थापन केल्यामुळे असंतोष निर्माण झाला.
हेही वाचा : Thackeray Vs Shinde : ठाकरे गटाचा युक्तिवाद संपला, युक्तिवादात कोणते मुद्दे मांडले गेले?
आमदार, खासदार आणि काही अपक्ष उद्धव ठाकरे यांच्या विरोधात भूमिका घेतली. ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्यपालांनी बहुमत सिद्ध करायला सांगितले, असा युक्तिवाद नीरज किशन कौल यांनी कोर्टात केला. त्याचवेळी आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा आज शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यानी केला.
दरम्यान उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करायला सांगण्याचे राज्यपालांचे निर्देश हे योग्यच होते. त्यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी त्यांना काही प्रश्न विचारले. आमदारांवर अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना ते बहुमत चाचणीसाठी मतदान कसे करणार असा प्रश्न सरन्यायाधीशांनी शिंदे गटाला विचारला. तसेच पक्षफुटीवरच प्रश्नचिन्ह असताना बहुमत चाचणी घेतली गेली? असाही सवाल त्यांनी विचारला. त्यावर शिंदे गटाचे वकील काही वेळ शांत बसले.
पुढे सरन्यायाधीशांनी पक्षफुटीवरच प्रश्नचिन्ह असताना बहुमत चाचणी घेतली गेली? असा प्रश्न विचारला. तर आपल्याला परिस्थितीचाही विचार केला पाहीजे, आमदारांना मतदान करता येतंय कारण अध्यक्षांना अपात्रतेचा निर्णय घेता आलेला नाही असं सरन्यायाधीश म्हणाले.