मराठवाड्याचं पाणीकेंद्र जायकवाडीत 73 टक्के पाणीसाठा; इतर जिल्ह्यांना मात्र पावसाची प्रतिक्षा

Jayakwadi Dam : मराठवाड्यासाठी अनेकदा दुष्काळच वाट्याला येत असतो. (Dam) कधीतरी पाणीदार मराठवाडा असं म्हणावं लागत अशी परिस्थिती आहे. एकीकडे नाशिक भागात झालेल्या चांगल्या पावसामुळे जुलै महिन्यातच जायकवाडी धरण 73 टक्क्यांपेक्षा जास्त भरले असताना इतर प्रकल्प मात्र अद्याप निम्म्याहून कमी तर काही प्रकल्पांमध्ये 25 टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा शिल्लक राहिला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात पावसाचे प्रमाण अवघे 50 टक्के इतके असल्याने शेतकरी हवालदिल झालाय. लावलेल्या पिकांना पाणी कमी पडल्याने काही प्रमाणात कीड लागलेली असल्याने दुबार पेरणीचे संकट अनेकांवर ओढवले आहे.
राज्यात अभितांश ठिकाणी वरुणराजा प्रसन्न झाला असला तरी मराठवाड्यात अद्याप म्हणावा तसा पाऊस झाला नाहीये. मराठवाड्यात सरासरीपेक्षा फक्त 50 टक्के एवढाच पाऊस झालाय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तर परिस्थिती अजून बिकट असून, पावसाळा अर्धा संपला तरी मोठा पाऊस जिल्ह्यात झालेला नाही. रिमझिम पावसामध्ये पेरण्या केलेल्या पिकांची वाढ खुंटलेली दिसून येत आहे. मागील आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस असल्याने पिकांवर रोग मोठ्या प्रमाणावर पसरलेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा फवारणीचा किंवा दुबार पेरणीचा खर्च वाढलाय. शेतकरी मोठ्या पावसाच्या अपेक्षेने आता आभाळाकडे पाहू लागला आहे.
छत्रपती संभाजीनगर पुन्हा हादरल; बांबू अन् बेल्टने बेदम मारहाण, तरुणाचा झाला मृत्यू
जायकवाडी धरणात पाण्याची आवक चांगली असल्याने जायकवाडी धरणात चांगला पाणीसाठा आला असला तरी मराठवाड्यातील निम्म्यांहून अधिक लघु आणि मध्यम प्रकल्पात 25 टक्क्यांपेक्षा कमी पाणी आहे. मराठवाड्यात 11 मोठ्या प्रकल्पांपैकी 3 प्रकल्पांत 25 टक्क्यांपेक्षा कमी तर 3 प्रकल्पांत 50 टक्क्यांपेक्षा कमी साठा आहे. 76 मध्यम प्रकल्प असून, 5 प्रकल्प जोत्याखाली तर 35 प्रकल्पांत 25 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे जायकवाडी धरण भरत आल्याचा आनंद असताना इतर प्रकल्पांमुळे चिंता वाढली आहे.
राज्यात बहुतांश भागात पावसाने जोर धरला असला तरी मराठवाड्यात पावसाने अद्याप जोर धरलेला नाही. मात्र, नाशिक जिल्ह्यात पावसाने जून महिन्यात दमदार हजेरी लावली अन् जायकवाडीच्या दिशेने पाणी झेपावले. मागील 25 वर्षांत पहिल्यांदाच जायकवाडी प्रकल्पात जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात पाणी दाखल झाले आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार, शनिवार सकाळपर्यंत 73.18 टक्के जलसाठा झाला आहे. सद्यस्थितीत जवळपास 20 हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. मागील वर्षी 12 जुलै रोजी धरणात अवघे 4 टक्के पाणी शिल्लक राहिले होते. आशिया खंडातील सर्वात मोठे धरण अशी ओळख असलेले धरण म्हणून जायकवाडी परिचित आहे. पाण्याचा ओघ असाच राहिला तर महिन्याच्या शेवटपर्यंत धरण 90 टक्क्यांपेक्षा अधिक भरल्यास धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.