आनंदाच्या शिधेचा आनंद केवळ सरकारला, जनतेला नाहीच…विरोधकांची टीका

मुंबई : राज्यातील शिधापत्रिका धारकांना अवघ्या 100 रुपयांमध्ये आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आता याच्या वाटपावरून सध्या राज्यात गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र समोर आले आहे. याच मुद्द्यांवरून आता विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. आनंदाच्या शिधेचा आनंद केवळ सरकार घेत आहे मात्र दुसरीकडे जनतेला काही मिळत नसल्याची टीका देखील यावेळी काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी केली आहे. यामुळे राज्यात सध्या सुरु असलेल्या आनंदाचा शिधेच्या गोधंळावरुन विरोधी पक्षाने सरकारला घेरण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.
राज्यात येणाऱ्या आगामी सणाच्या अनुषंगाने राज्य सरकारने राज्यातील शिधापत्रिका धारकांना100 रुपयांमध्ये आनंदाचा शिधा देण्याची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात अनेकांना हा शिधा अद्याप प्राप्त झालेला नाही आहे. आता यावरून विरोधी पक्षाकडून सत्ताधारी मंडळींवर निशाणा साधण्यात आला आहे.
सरकार कुणाची वाट पाहतंय?
आनंदाचा शिधा वाटपाच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर म्हणाले, सध्या राज्यात काही निवडणुका नाही आहे. जेव्हा राज्यात निवडणुका असतात तेव्हा अशा प्रकारच्या घोषणा होतात. कसब्यात देखील अशा घोषणा झाल्या मात्र मतदारांनी दाखवून दिले. सरकार केवळ अशा घोषणा करते मात्र सत्यतेत किती लोकांना याचा लाभ होतो हे देखील पाहणे महत्वाचे आहे.
शेवगाव नगर परिषदेच्या कचरा डेपोला आग !
याचा आनंद सरकार घेतंय
याआधीही दिवाळीच्या वेळी अशी घोषणा करण्यात आल्या होत्या, मात्र लोकांपर्यंत हा आनंदाचा शिधा काही पोहचलं नाही. यामुळे या शिधाचा आनंद हा सरकार घेत आहे, जनतेला याचा काय आनंद होणार हे माहिती नाही अशा शब्दात काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
‘त्या’ प्रलंबित प्रश्नी आमदार आशुतोष काळेंचे गृहमंत्र्यांना साकडं
केवळ घोषणा…
मुख्यमंत्री शिंदे यांनी आगामी सणांच्या अनुषंगाने शिधा वाटपाची घोषणा अनेकदा केली. मात्र सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे मात्र तरीही राज्यातील शिधा धारकांना आनंदाचा शिधा मिळालेला नाही आहे. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की राज्यातील गोरगरिबांना हा शिधा लवकरात लवकर मिळावा यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार संजय बनसोडे यांनी केली आहे.
शिधा पोहचवण्याची तयारी सुरु…
आनंदाचा शिधा काही ठिकाणी पोहचण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. गुढीपाढवा ते आंबेडकर जयंती यादरम्यान राज्यातील भागांमध्ये हा शिधा पोहचवायचा आहे. हा शिधा एकाचवेळी पोहचवायचा की टप्प्याटप्प्याने पोहचवायचा याबाबत अन्न पुरवठा मंत्र्यांशी चर्चा सुरु असल्याची प्रतिक्रिया आमदार शंभूराज देसाई यांनी दिली आहे.