Uddhav Thackeray यांचं ठरलं : पदरात काही नाही पडले तरी भाजपशी युती नाही!
मुंबई : कितीही काही झाले तरी चालेल. त्यासाठी आपल्या पदरात काही नाही पडलं तरी चालेल. पण भारतीय जनता पार्टीबरोबर कोणत्याही परिस्थितीत युती करणार नाही. हे महाविकास आघाडीतील (MVA) सर्वच पक्षांनी ठरवले पाहिजे, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केले. महाविकास आघाडीच्या बैठकीत भाजपला चांगलेच झोडपून काढले.
महाविकास आघाडीच्या बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेसचे नेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात, सुनील केदार, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते.
Uddhav Thackeray : शरद पवार पंतप्रधान झाले तरी चालतील… पण तंगड्यात तंगडे घालू नका!
उद्धव ठाकरे म्हणाले की, मला विकलेल्या नाहीतर लढणाऱ्या माणसांना घेऊन लढाई लढाईची आहे. मी नसलो तरी चालेल पण लोकशाही टिकली पाहिजे. आपल्याला लोकसभा, विधानसभेचे तिकीट नाही मिळाले तरी चालेल. कोणतेही पद नाही मिळाले तरी चालेल. पण गावागावात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा इतर सर्वच निवडणुकांमध्ये एकदिलाने काम करा. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरु आहे. त्यामुळे लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र काम करा. २०२४ ची निवडणूक ही शेवटची निवडणूक असेल. नंतर मग हुकूमशाहीच असेल. त्यामुळे पदरात काही नाही पडले तरी चालेल पण भाजपशी कोणत्याही परिस्थितीत युती न करता आपण वाटचाल केली पाहिजे.
आमच्यात सामील व्हा नाहीतर तुरुंगात जा, अशी धमकी सध्या विरोधकांना दिली जात आहे. एकतर भाजपमध्ये या नाहीतर तुरुंगात जा, या पद्धतीने नेते, कार्यकर्ते त्रास देण्याचे काम सुरु आहे. सगळीकडे त्यांनाच सत्ता हवी आहे म्हणून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजेच देश असे चित्र उभे केले जात आहे. मग भारतमाता काय आहे. कशाला मग ‘भारतमाता की जय’च्या घोषणा देता. मोदी जिंदाबादच्या घोषणा द्या, उगाच नाटकं कशाला करता. लोकांमध्ये उगाच भ्रम निर्माण करायचे काम केले जात आहे. देश हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहे. २०२४ ची निवडणूक ही शेवटची निवडणूक ठरेल. त्यामुळे आताच जागे व्हा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.