मराठी माणूस मुंबईत नाही तर गुजरात, गवाहाटीला जाणार का?, उद्धव ठाकरेंचा शिंदेना टोला

Uddhav Thackeray on Maratha Morcha in Mumbai : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha) मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. मनोज जरांगे पाटील ४८ तासांचा प्रवास करून, लाखो मराठा आंदोलकांसह आज सकाळी मुंबईतील आझाद मैदानावर दाखल झाले. आझाद मैदानात पोहोचताच त्यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे.
या आंदोलनाला परवानगी दिल्याबद्दल मनोज जरांगे पाटील यांनी सरकारचे आभार मानले असले तरी त्यांनी थेट उपोषणाचा पवित्रा घेतलेला आहे. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्घव ठाकरेंनी टीका केली आहे. मराठी माणूस मुंबईत नाही येणार तर मग सुरत आणि गुवाहाटीला जाणार का, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. या दरम्यान उद्धव ठाकरेंना मराठा आंदोलनाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले. आतापर्यंत या लोकांना वापरुन फेकून देण्यात आलं. पण मग आता त्यांचे सरकार आहे, त्यामुळे त्यांनी आरक्षण द्यायला हवे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
तुम्ही माजलेली औलाद दिसताय; CSMT वर गोंधळ घालून गालबोट लावणाऱ्यांना जरांगेंनी झापलं
नाईलाजाने त्यांना न्याय हक्कासाठी मुंबईत यावं लागलं आहे. त्यावेळी फडणवीसांनी सांगितलं होतं की जर त्यांचं सरकार असतं तर त्यांनी यांना न्याय दिला असता. दुसरे एक आहेत त्यांनी तर शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती. आतापर्यंत या लोकांना वापरुन फेकून देण्यात आलं. पण मग आता त्यांचे सरकार आहे, त्यामुळे त्यांनी आरक्षण द्यायला हवे. आमचं सरकार पाडून तुमचं सरकार तुम्ही आणलात मग आमचं सरकार पाडलात कशासाठी, असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला. मराठी माणूस मुंबईत नाही येणार तर मग सुरत आणि गुवाहाटीला जाणार का. कारण मुंबई ही मराठी माणसाची राजधानी आहे. ज्यांनी आरक्षण देऊ हे शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं, तेच आज सत्तेत आहेत, हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा.
पुन्हा पुन्हा मुख्यमंत्री होऊनही प्रश्न का सुटत नाही. आतापर्यंत मराठ्यांना फसवण्यात आले. ही सर्व जबाबदारी सरकारची आहे. गणेशोत्सव सुरु आहे. जी काही मराठी माणसं मुंबईत आलेली आहेत, ती इथे दंगल करायला आलेली नाही. न्यायहक्कासाठी आली आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ज्यांनी आरक्षण देऊ म्हणून शड्डू ठोकले होते ते लोक आता गावी पळालेत. का फक्त दर्शन घेतात. गेले अडीच वर्ष ते मुख्यमंत्री होते, आता अडीच वर्ष ते उपमुख्यमंत्री आहेत मग ते जरांगेंना न्याय का देऊ शकत नाहीत. फक्त टोलावाटोलवी सुरु आहे. त्यावर जो काही तोडगा आहे तो त्यांनी काढायला हवा, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.