Letsupp Special : Barsu Refinery वरून उद्धव ठाकरेंची कोंडी? पवारांची भूमिका ठाकरेंना पुन्हा अडचणीत आणणार?

  • Written By: Published:
Letsupp Special : Barsu Refinery वरून उद्धव ठाकरेंची कोंडी? पवारांची भूमिका ठाकरेंना पुन्हा अडचणीत आणणार?

Letsupp Special : राज्यभरात सध्या बारसू रिफायनरीवरून (Barsu Refinery) मोठा वाद पेटल्याचं दिसत आहे. प्रकल्पाचं सर्वेक्षण अद्याप सुरु करण्यात आलेलं नसून सध्या फक्त मातीची तपासणी सुरु असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी सांगितलं आहे. पण विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली असल्याची परिस्थिती आहे. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मात्र कोंडी झाल्याचं पाहायला मिळतं आहे. त्यामुळे अजूनही ठाकरे गटाकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

अशा परिस्थितीमध्ये बारसू रिफायनरी हा आता राजकीय मुद्दा झाला आहे. पण यामध्ये देखील उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न चालू आहे, असं दिसतं आहे. बारसूवर वाद पेटला असताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी थेट शरद पवार यांच्याशी भेटून चर्चा केली. शिवाय त्यानंतर मुख्यंमत्री (CM) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात देखील चर्चा झाल्याचं समोर येत आहे.

याशिवाय सत्ताधारी पक्षाकडून नाना पटोले (Nana Patole) यांच्याशीही चर्चा केली गेल्याच बोललं जात आहे. त्यावर नाना पटोले यांनीही विकासाच्या आड येणार नसल्याचं जाहीर केलं आहे, अशी भूमिका घेतली आहे. तर उदय सामंत यांच्याकडून राज ठाकरे यांचीही भेट घेतली जाणार आहे. तशी त्यांनी राज ठाकरे यांना वेळ मागितल्याचंही सांगितलं आहे. पण सत्ताधारी पक्षाकडून मात्र अजूनही उद्धव ठाकरे यांना मात्र संपर्क केला जात नाही. याच आश्चर्य आहे.

Parshuram Ghat : मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी…

विकासाला विरोध नाही

आज सकाळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शरद पवार यांची भेट घेतली, त्यावेळी त्यांनी या मुद्यावरून त्यांच्याशी चर्चा झाल्याचं सांगितलं. या भेटीनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी या प्रकल्पाच्या विरोधात एक शब्दही काढला नाही. फक्त त्यांनी स्थानिक लोकांशी मी अजून बोललो नाही, त्यामुळे इतकं सांगू शकत नाही. पण राज्यात एखादा मोठा प्रकल्प होत असेल तर स्थानिक लोकांचा विरोध का आहे, हे समजून घेतलं पाहिजे. अशी भूमिका घेतली.

तर आमचा विकासाला, उद्योगाला विरोध नाही पण सरकारने स्थानिकांचे मत ऐकून घ्यायला हवे. त्या आंदोलकांसोबत, स्थानिक लोकांसोबत बसून हा प्रश्न सोडवावा, अशी भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली आहे. पण या सगळ्या मध्ये ठाकरे गटाची नक्की भूमिका काय असा प्रश्न विचारला जात आहे. कारण ठाकरे गटातील वेगवेगळ्या नेत्याकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

मुख्यंमत्री असताना ठाकरे यांचंच पत्र

मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनीच बारसू येथील जागा सुचविली होती. त्यांनी रिफायनरीच्या समर्थनार्थ मोदींना पत्र पाठवले होते. 12 जानेवारी 2022 रोजी हे पत्र पाठवण्यात आलं होतं. त्यावेळी राज्य सरकारने बारसू येथे 13 हजार एकर जमीन प्रकल्पासाठी देण्याची तयारी दाखविली होती. तसेच येथील बहुतांश जागा ओसाड असल्याने पुनर्वसनाचा प्रश्न फारसा येणार नाही, असेही या पत्रात म्हटले होते.

या पत्रानंतरच केंद्राने रिफायनरी सुरू करण्यासाठी परवानगी दिली होती. हे पत्र समोर आल्याने आता ठाकरे गटाचीही कोंडी झाली आहे. सत्ताधारी गटातील नेते या पत्रावरून ठाकरे गटावर टीका करू लागले आहेत.

Parshuram Ghat : मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी…

ठाकरे गटातील विसंवाद

बारसू रिफायनरीवरचा हा मुद्दा आता राज्यभर गाजत असताना ठाकरे गटाकडून मात्र त्यांचे नेतेच आमने-सामने आलेले पाहायला मिळत आहेत. कारण बारसू रिफायनरी ज्या भागात होत आहे. तेथील स्थानिक आमदार राजन साळवी हे प्रकल्पाच्या समर्थनार्थ उतरले आहेत. त्यांनी ट्विट करून म्हटलं आहे की, “कोकणातील बेरोजगारीच्या मुद्द्यावर प्रकल्पाला समर्थनच…. माझ्या विरोध करणाऱ्या नागरिकांना प्रकल्पाची बाजू पटवून प्रशासनाने द्यावी त्यांच्यावर अन्याय करू नये.”

काही दिवसापूर्वी याच मुद्द्यावर ते म्हणाले होते की, “कोकणात रिफायनरी प्रकल्प आल्यास येथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. कोकणातील युवक हा वर्ग रोजगार मिळवण्यासाठी मुंबईत स्थायिक झाला आहे, मात्र, हा प्रकल्प कोकणाच्या भूमीत आल्यास इथल्या बेरोजगार युवकांना नोकरीसाठी वणवण फिरावं लागणार नाही. त्यांना इथेच रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील.” याच बेरोजगारीच्या मुद्द्यावरून कोकणातील प्रकल्पाला समर्थन आहे, असं राजन साळवी म्हणाले.

राजन साळवी या प्रकल्पाला पाठिंबा देत असले तरी स्थानिक खासदार मात्र या प्रकल्पाच्या विरोधात आहे. खासदार विनायक राऊत यांनी आज थेट प्रत्यक्ष आंदोलन स्थळी जाऊन सरकारवर टीका केली. स्थानिक आंदोलकांच्य प्रश्नांवर बोलताना राऊत म्हणाले की, स्थानिक नागरिकांचे जोपर्यंत प्रश्न आहेत. त्यांच्या अडचणी जोपर्यत सोडवल्या जात नाहीत. तोपर्यंत शिवसेना ठाकरे गट स्थानिक नागरिकांच्या पाठीशी उभी राहील. सामाजिक कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटिसी येत आहेत पण अशा पोलिसांच्या नोटिसी आल्या तरी आम्ही त्याला किंमत देत नाही.

दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत देखील पहिल्या दिवसापासून यावर टीका करताना दिसत आहेत. त्यांनी सरकारला जालियनवाला बाग घडवायचं आहे. अशी टीका देखील आंदोलनावर केली आहे. आपण आंदोलकांच्या पाठीशी असून गरज पडल्यास उद्धव ठाकरे राजपूरला येतील, असं देखील राऊत यांनी सांगितलं. पण यावर उद्धव ठाकरे मात्र अजून काहीच बोलले नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची नक्की भूमिका काय असा प्रश्न विचारला जात आहे.

कर्नाटक BJP कडून तब्बल दीड लाख कोटी रुपयांची लूट, प्रियंका गांधींनी केले आरोप

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube