लग्नसोहळ्यावर रक्ताची सावली; संपत्तीच्या वादातून अल्पवयीन पुतण्याचा वरातीत चाकू हल्ला, काका आणि चुलत भावाचा मृत्यू

एकीकडे लग्नाचा मंगल सोहळा आणि दुसरीकडे त्याच ठिकाणी घडलेली दुहेरी हत्या. वर्धा जिल्ह्यातील ही घटना सध्या संपूर्ण राज्याला हादरवून सोडत आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 44

Uncle and cousin die in attack by minor nephew : लग्न म्हणजे आनंद, उत्सव आणि दोन कुटुंबांना जोडणारा पवित्र बंद, मात्र याच आनंदोत्सवात जर रक्तरंजित घटना घडली, तर तो सोहळा कायमचा काळवंडून जातो. अशीच एक धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्यातून समोर आली आहे. जिथे लग्नाच्या वारातीतच अल्पवयीन पुतण्याने चाकू हल्ला करत काका आणि चुलत भावाचा जीव घेतला. वर्धा जिल्ह्यातील बरबादी परिसरात भलमे कुटुंबात लग्नाचा उत्साह शिगेला पोहोचला होता. घरात आनंदच वातावरण होतं, नातेवाईक, मित्रमंडळी सगळे जमले होते. नवरदेवाची घोड्यावरून वरात मोठ्या थाटामाटात निघाली होती. बँडबाजा, ढोल-ताशांच्या गजरात नाचगाणं सुरू होतं आणि सगळे मुहूर्ताची आतुरतेने वाट पाहत होते.

मात्र, या आनंदाच्या वातावरणाला अचानक ग्रहण लागलं. वरात हनुमान मंदिराजवळ पोहोचताच, एका किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. हा वाद इतका टोकाला गेला की, अल्पवयीन पुतण्याने आपल्या काका प्रभाकर भलमे आणि चुलत भाऊ रितेश भलमे यांच्यावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात दोघे देखील गंभीर जखमी झाले. तातडीने त्यांना सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच दोघांनाही मृत घोषित केले. या घटनेमुळे लग्नसोहळ्यात एकच खळबळ उडाली आणि आनंदाचे वातावरण शोककळेत बदलले.

या घटनेमागे संपत्तीचा वाद असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. भलमे कुटुंबात गेल्या काही दिवसांपासून मालमत्तेवरून तणाव होता. सुमारे आठ महिन्यांपूर्वी देखील याच कारणावरून आरोपी आणि पाकमध्ये वाद झाला होता आणि त्यावेळी दोन्ही बाजूंनी गुन्हे दाखल झाले होते. धक्कादायक बाब म्हणजे, या हल्ल्याचा कट आधीच रचला गेला होता. अल्पवयीन आरोपीने काका आणि चुलत भावाचा जीव घेण्याचा निर्धार केला होता. त्यासाठी त्याने ऑनलाईन चाकू मागवल्याची माहिती देखील तपासात समोर आली आहे. आणि अखेर, घरातील लग्नसोहळाच त्याने या कटासाठी निवडला.

दरम्यान, वरात सेवाग्राम मार्गावर हनुमान मंदिराजवळ पोहोचताच, आरोपीने संधी साधून हल्ला चढवला आणि काही क्षणांतच दोन जीवांचा बळी गेला. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. मात्र, एका छोट्याशा वादातून उफाळलेला राग आणि सुडाची भावना इतकी टोकाला जाऊ शकते, याचा हा धक्कादायक नमुना ठरला आहे. एकीकडे लग्नाचा मंगल सोहळा आणि दुसरीकडे त्याच ठिकाणी घडलेली दुहेरी हत्या. वर्धा जिल्ह्यातील ही घटना सध्या संपूर्ण राज्याला हादरवून सोडत आहे.

follow us