इंदापूर नगरपरिषद निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का; भरत शहा यांनी प्रवीण गारटकर यांना चारली धूळ
अतितटी लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्ता भरणे यांच्या उमेदवाराने गड राखला; भरत शहा यांनी भाजपच्या उमेदवाराला चारली धूळ
Big blow to Harshvardhan Patil :
राज्याच्या राजकारणाची समीकरणं बदलणारा निकाल इंदापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत लागला आहे. अतितटी आणि प्रतिष्ठेच्या या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्ता भरणे यांच्या उमेदवाराने गड राखला आहे. भाजपचे(BJP) नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रवीण गारटकर यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. अवघ्या 120 मतांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भरत शहा यांनी भाजपच्या उमेदवाराला धूळ चारत आपली ताकद दाखवून दिली आहे. चुरशीच्या लढाईत भरत शहा यांनी अखेर विजय खेचून आणलाय. कृषी मंत्री भरणे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने(NCP) इंदापूरमध्ये(Indapur) आपली पकड मजबूत करत 14 नगरसेवक निवडून आणले आणत नागरपरिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकावला आहे.
दुसरीकडे, हर्षवर्धन पाटील(Harshvardhan Patil) आणि प्रवीण माने यांच्या गटाला अपेक्षित यश मिळू शकले नाही. त्यांच्या समर्थक उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. विशेषतः प्रदीप गारटकर यांचा पराभव हा या गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. गारटकर यांना हर्षवर्धन पाटील, प्रवीण माने यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांचा पाठिंबा होता, मात्र तो मतपेट्यांपर्यंत पोहोचू शकला नाही. परिणामी तिघांनाही पराभवाची चव चाखावी लागली. इंदापूर नगरपरिषदेत एकूण निकाल पाहता राष्ट्रवादी काँग्रेसने दमदार कामगिरी करत 15 उमेदवार विजयी केले आहेत. तर कृष्णा भीमा विकास आघाडीला पाच जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निकालामुळे नगरपरिषदेत सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती भक्कम झाली आहे. नगराध्यक्षपदावरही राष्ट्रवादी काँग्रेसचेच भरत शहा विराजमान झाल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
या निवडणुकीचा निकाल इंदापूरच्या राजकारणात दूरगामी परिणाम करणारा ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. एकीकडे दत्ता भरणे यांची स्थानिक पातळीवरील पकड अधिक मजबूत झाली आहे, तर दुसरीकडे हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेषतः भाजपसाठी हा निकाल धक्कादायक मानला जात असून आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने हा इशारा असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. एकूणच, इंदापूर नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व सिद्ध करत विरोधकांना धक्का दिला असून, भरत शहा यांच्या विजयामुळे अजित पवार गटाची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
