वंचित बहुजन आघाडीचे ईव्हीएम विरोधात आंदोलन, नगर शहरात स्वाक्षरी मोहीम सुरु
Prakash Ambedkar : राज्यामध्ये महायुतीची एकहाती सत्ता आली. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत ईव्हीएमचा घोटाळा (EVM Scam) असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीतर्फे (VBA) आंदोलन करण्यात आले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) महापरिनिर्वाण दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीने नगर शहरातील मार्केटयार्ड चौक या ठिकाणी ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका पार पडल्या असून महायुतीने मोठे यश संपादन केले आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. विरोधकांनी परभवाचे खापर ईव्हीएमवर फोडले आहे. दरम्यान ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीन तपासणी व पडताळणीचे अर्ज निवडणूक आयोगाकडे मोठ्या प्रमाणात पराभूत उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. ईव्हीएम मध्ये नेमका घोळ झालाय का याचे उत्तर पडताळणी नंतर समोर येणार आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी ईव्हीएम विरोधात जनआंदोलनाची हाक दिली होती. यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात ईव्हीएम विरोधी जनआंदोलनाची हाक देण्यात आली आहे. स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्या टप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता.
3 डिसेंबर ते 16 डिसेंबरपर्यंत राज्यात ईव्हीएम विरोधी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील मतदारांना ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
EVM पडताळणीसाठी ‘या’ जिल्ह्यातून उमेदवाराचा एकही अर्ज नाही
2004 पासून ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. ईव्हीएम च्या विरोधात न्यायालयीन लढाई सुद्धा ते लढत आहेत. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ईव्हीएम वापरामधील मधील अनेक घोळ त्यांनी माध्यमासमोर मांडले आहेत. ईव्हीएमच्या विरोधात आरपारची लढाई लढण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतला आहे.