वसंत मोरे यांच्याच राजकारणाला कात्रजचा घाट; मुलगा रुपेशसह वसंत मोरेंचा पराभव
पुण्यातील डॅशिंग नेते अशी ओळख असलेल्या वसंत मोरे यांना पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकाचवेळी दोन आघाड्यांवर मोठा राजकीय धक्का बसला आहे.
Vasant More and his son suffer heavy defeat in the municipal elections : पुण्यातील डॅशिंग नेते अशी ओळख असलेल्या वसंत मोरे यांना पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकाचवेळी दोन आघाड्यांवर मोठा राजकीय धक्का बसला आहे. एकीकडे पहिल्याच निवडणुकीत वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे यांचा सपाटून पराभव झाला, तर दुसरीकडे स्वतः वसंत मोरे यांचा देखील दारुण पराभव झाला आहे. त्यामुळे ‘कात्रजचा घाट दाखवतो’ म्हणणाऱ्या वसंत मोरे यांच्याच राजकारणाला आता कात्रजचा घाट लागल्याची चर्चा सुरू झाली आहे. वसंत मोरे यांनी यंदाच्या निवडणुकीत आपला लाडका लेक रुपेश मोरे याला राजकारणात उतरवत पुणे महापालिकेच्या रिंगणात लॉन्च केलं होतं. कात्रज परिसरात वसंत मोरे यांनी रुपेशसाठी जोरदार प्रचार केला होता. मात्र, घरच्या मैदानावरच रुपेश मोरे यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.
प्रभाग क्रमांक 40 (ड) मधून भाजपच्या उमेदवार रंजना कुंडलिक टिळेकर यांनी विजय मिळवत रुपेश मोरे यांचा पराभव केला आहे. रंजना टिळेकर यांना तब्बल 25 हजार 859 मते मिळाली. सुरुवातीपासूनच या प्रभागात अटीतटीची लढत पाहायला मिळाली. काही फेऱ्यांपर्यंत रुपेश मोरे आघाडीवर होते, मात्र अखेरच्या मतमोजणीत भाजपच्या उमेदवाराने निर्णायक आघाडी घेत विजय खेचून आणला. परिणामी, पहिल्याच निवडणुकीत रुपेश मोरे यांचा राजकीय प्रवास पराभवाने सुरू झाला आहे.
शतक : संघ के 100 वर्ष’ च्या ट्रेलरचा अनावरण भव्य सोहळा; डॉ. मनमोहन वैद्यांच्या हस्ते अनावरण
केवळ मुलगाच नाही, तर वडील वसंत मोरे यांच्यासाठी देखील ही निवडणूक निराशाजनक ठरली आहे. वसंत मोरे स्वतः प्रभाग क्रमांक 38 (हडपसर–कोंढवा बुद्रुक) मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून निवडणूक लढवत होते. मात्र या प्रभागातून वसंत मोरे यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे एकाच दिवशी मुलाचा आणि स्वतःचा पराभव, असा दुहेरी फटका वसंत मोरेंना बसला आहे. कात्रज हा वसंत मोरे यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र यंदा कात्रजमधील चारही जागा भाजपने जिंकल्याने मोरेंच्या राजकीय गडालाच सुरुंग लागल्याचं चित्र आहे. स्थानिक पातळीवर प्रभावी मानल्या जाणाऱ्या मोरेंच्या ताकदीला हा मोठा धक्का मानला जात आहे. निवडणूक निर्णय अधिकारी सुप्रिया करमरकर यांनी प्रभाग क्रमांक 38 चा निकाल अनाउन्स केला. यामध्ये इ गटातून व्यंकोजी खोपडे वैधरीत्या निवडून आल्याचे त्यांनी अनाऊन्स केले आहे.. दरम्यान वसंत मोरे आणि त्यांचे कार्यकर्ते बाहेर पडले असून, वसंत मोरे याबाबत फेसबुकवर लाईव्ह येणार असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, रंजना टिळेकर यांच्या विजयामुळे भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर यांची ताकद या भागात पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. मतदानाच्या आदल्या रात्री या प्रभागात चांदीच्या वाट्या वाटल्याचा आरोप वसंत मोरे यांनी केला होता. मात्र, सर्व आरोपांवर मात करत मतदारांनी भाजपच्या पारड्यात आपलं मत टाकल्याचं निकालातून स्पष्ट झालं आहे. एकंदर पाहता, पुणे महापालिका निवडणुकीत वसंत मोरे यांच्यासाठी हा निकाल धक्कादायक ठरला असून, मुलाबरोबरच वडिलांचाही पराभव झाल्याने मोरेंच्या राजकीय भवितव्याबाबत आता नवी चर्चा सुरू झाली आहे.
