आमच्याही चुलीमध्ये इंधन, लागेल तेवढी खिचडी… बच्चू कडूंनी अनिल बोंडेंना सुनावले!
Bachchu Kadu On Anil Bonde : सध्या अमरावती (Amaravati) जिल्ह्यातील नेते एकमेंकांवर थेट आरोप करत आहेत. खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांनी काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांच्यावर जोरदार आरोप केले होते. त्यात बच्चू कडूंनी रवी राणांवर राजकीय टिप्पणी केली होती. आता आमदार बच्चू (Bachchu Kadu) आणि भाजपचे (BJP) अमरावतीचे जिल्हाध्यक्ष अनिल बोंडे (Anil Bonde) यांच्यात जुंपली आहे. सोबत राहून अफजल खानासारखी मिठी मारण्याची प्रकार भाजपने थांबवावेत, असे बच्चू कडू यांनी म्हटले होते. त्याला अनिल बोंडे यांनी प्रत्युत्तर दिले होते. त्याला आता बच्चू कडू यांनी जोरदार उत्तर दिले आहे. (Argument between MLA Bachchu Kadu and BJP Amravati District President Anil Bonde)
बच्चू कडू म्हणाले, नवख्या देवेंद्र भुयार यांच्याकडून अनिल बोंडे पराभूत झाले आहेत. नवख्या उमेदवाराकडून ते पडले आहेत. त्यामुळे गर्व कोणाला आहे हे जनतेने दाखवले आहे. आता त्यांनी जास्त बोलू नये. आम्हाला गर्व नाही. सर्व शेतकरी, मजूर बांधवांवर आमचा आत्मविश्वास आहे. त्यांच्यामुळे मी निवडून येणार हे नक्की आहे. भाजपच्या माध्यमातून बच्चू कडूंना कसे पाडायचे, त्यासाठी कसे शस्त्र वापरायचे आहे हे काही जण करत आहेत. त्याबाबत मी बोलले होतो. काही जण सोबत राहून अफजल खानासाराखी मिठी मारण्याचा प्रकार करतात. भाजपने हे थांबवावे असे मी म्हणालो होती, असे स्पष्टीकरण बच्चू कडू यांनी दिली आहे.
मागील निवडणुकीत अनिल बोंडे तुम्ही फोन केला होता पाठिंबा द्या म्हणून. देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यासोबत चर्चा करण्यापूर्वी त्यांनी इथल्या लोकांना थांबवले पाहिजे. ते मुद्दाम अडचण निर्माण करतात. त्यांना थांबविले पाहिजे. आम्हाला पाडण्याची ताकद कुणी ठेवू नये. आम्ही स्वतःहून वेगळी चूल मांडणार नाही. पण आमच्याही चुलीमध्ये इंधन आहे. लागेल तेवढी खिचडी पकवून तयार आहे. तुम्ही मुद्दामहून चुलीसहीत इंधन काढण्याची गरज नाही. शेपटावर दहावेळा पाय देण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत. आम्हाला पाडण्याचा प्रयत्न केला तर आमच्याही हाती पूर्ण महाराष्ट्र आहे लक्षात ठेवा असे आव्हान बच्चू कडू यांनी दिले आहे.
काय म्हणाले होते बोंडे ?
स्वतःबद्दल काही लोकांना अहंकार, गर्व निर्माण झाला आहे. त्याचाही परिणाम होतो. गर्वाचे घर खाली होते. रावण, कंसाला कुठे वाटले होते पराभव होईल. जनता पाडते याचा आम्हाला अनुभव आहे. गर्वाचे घर खाली होऊ नये याची काळजी घ्यावी, असा टोला बोंडे यांनी बच्चू कडू यांना लगावला आहे.