विद्यार्थ्याची फसवणूक, शैक्षणिक कर्जाच्या नावावर ३७ लाखाचा गंडा; कागदपत्रावर उचलले वैयक्तिक कर्ज

विद्यार्थ्याची फसवणूक, शैक्षणिक कर्जाच्या नावावर ३७ लाखाचा गंडा; कागदपत्रावर उचलले वैयक्तिक कर्ज

नागपूर – कर्नाटकातील बेंगळुरूच्या एका शैक्षणिक कंपनीने शिक्षणाच्या ‘फी’ साठी कर्ज मंजूर करण्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या कागदपत्राच्या आधारे फायनान्स कंपनीकडून (Finance Company) पर्सनल कर्ज (Personal loan) उचलले. ती रक्कम कंपनीच्या खात्यात जमा केली आणि शैक्षणिक कोर्स बंद करून स्टायफंड देणेही बंद केले. अशा पध्दतीने शैक्षणिक कंपनीने १५ विद्यार्थ्यांना ३७ लाखांनी गंडा घातला. (Cheating of students, Rs 37 Lakhs in the name of education loan; Personal loan taken on paper)

हा फसवणुकीचा प्रकार एमआयडीसी पोलिस ठाण्याअंतर्गत उघडकीस आला. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी कंपनीसह आरोपी संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

प्राप्त माहितीनुसार फिर्यादी गौरव श्रीवास्तव (३९), रा. वानाडोंगरी यांना डेटा सायन्स आर्किटेक्ट प्रोग्राम कोर्स, हा गिकलर्न सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीच्या साईटवर दिसला. कोर्स शिकायचा असल्याने त्याने नोंदणी केली. कोर्सकरिता २ लाख ७८ हजार रुपये शुल्क होते. त्याकरिता कंपनी त्यांचे फायनंन्स पार्टनर म्हणून शैक्षणिक कर्ज काढून देणार तसेच कंपनीकडून स्टायफंड देण्यात येईल, असे आमिष देण्यात आले.

मागाठाणे मेट्रो स्थानकाबाहेरचा रस्ता खचला, मेट्रोने स्थानकात जाण्याच्या मार्गात केला बदल 

याशिवाय घेतलेल्या कर्जाची ३६ महिने हप्ते भरावे लागतील. २४ महिन्याचे आत जॉब मिळाल्यास कर्जाची उर्वरित रक्कम विद्यार्थी भरतील. नोकरी न मिळाल्यास संपूर्ण रक्कम कंपनी भरेल. असे आमिष फिर्यादीला देण्यात आले. त्यामुळे फिर्यादी कंपनीच्या जाळ्यात अडकला. कंपनीने फिर्यादीकडून आधार, पॅन, लाईव्ह फोटो, बँकेचे स्टेटमेंट व डीजीटल स्वाक्षरी आदीची माहिती ऑनलाईन घेतली व तसा करारसुध्दा केला.

मात्र, कंपनीने शैक्षणिक कर्जाऐवजी फायनान्सकडून पर्सलन लोन, अधिक व्याजदराने काढून ती रक्कम कंपनीच्या खात्यावर जमा केली. यानंतर कंपनीने शैक्षणिक कोर्स बंद करून स्टायफंड देणे बंद केले. अशाप्रकारे शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्याची फसवणूक करण्यात आली. हा मोठ्या रॅकेटचा भाग असल्याचे नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी गंभीरतेने घेऊन सदर तपास गुन्हे शाखेकडे सोपवावा, तसेच सर्व आरोपींना अटक करून न्याय मिळवून द्यावा, अशी पीडित विद्यार्थ्याची मागणी आहे.

फायनांस कंपनीचे कर्ज कसे भरावे, पीडित विद्यार्थ्यांचा प्रश्न
दुसरीकडे, फायनान्स कंपनी कर्जाच्या हप्त्याकरिता विद्यार्थ्याकडे तगादा लावत आहेत. कंपनीने फिर्यादीसह इतर १५ विद्यार्थ्याकडून एकूण ३७ लाख ६६ हजार रुपये घेऊन विश्वासघात करून फसवणूक केली. या प्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी गिकलर्न एज्युकेशन सर्व्हिसेस प्रा. लि. (बेंगळुरू, कर्नाटका) चे मॅनेजिंग डारेक्टर कमलापुरम श्रीनिवास कल्याण यांच्याविरुध्द गुन्हा नोंदविला आहे. तर फायनांस कंपनीचे कर्ज कसे भरावे, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उपस्थित झाला आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube