अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांची तब्येत बिघडली; नागपुरमध्ये रुग्णालयात दाखल
या उपचारांमुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील २५ दिवस त्यांना पूर्ण बेडरेस्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
          अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना नागपूरमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Rana) लोकसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या जुन्या इजेचा त्रास पुन्हा उद्भवल्याने त्यांना उपचारासाठी तातडीने दाखल करण्यात आलं. सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. गिरीश मोटवानी यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या त्या उपचार घेत आहेत.
या उपचारांमुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील २५ दिवस त्यांना पूर्ण बेडरेस्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नवनीत राणा यांच्या पायाला झालेली दुखापत ही लोकसभा निवडणुकीच्या प्रचार काळात झालेल्या फ्रॅक्चरशी संबंधित असल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं आहे. निवडणुकीच्या काळात सतत प्रवास, सभा आणि जनसंपर्क मोहिमेमुळे त्या इजेला पूर्ण विश्रांती मिळाली नव्हती. त्यामुळे आता त्याच ठिकाणी सूज आणि गाठ तयार झाली आहे.
मी कट्टर हिंदुत्ववादी, गोळ्या खाईल, पण कुराण; नवनीत राणांकडून हिंदुत्ववादाचा एल्गार
अमरावती येथील नामांकित ऑर्थोपेडिक तज्ञ डॉ. शाम राठी यांच्या सल्ल्यानुसार नवनीत राणा यांना नागपूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.रुग्णालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार त्यांना काही काळ शारीरिक हालचाल टाळावी लागेल आणि आवश्यक ते उपचार पूर्ण केल्यानंतरच त्या पुन्हा राजकीय कार्यात सहभागी होऊ शकतील. त्यांचे पती आमदार रवी राणा हे सतत रुग्णालयात त्यांच्या सोबत उपस्थित आहेत.
दरम्यान, नवनीत राणा यांना काही दिवसांपूर्वी धमक्या मिळाल्याचा मुद्दा चर्चेत आला होता. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांकडे सोपवण्यात आली आहे. रुग्णालय परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला असून केवळ त्यांच्या जवळच्या व्यक्तींनाच भेटण्याची परवानगी दिली जात आहे. पोलिसांकडून सर्वोतोपरी काळजी घेतली जात आहे. कारण नवनीत राणा यांना नुकत्याच काही दिवसांत दोनवेळा धमकी देण्यात आली आहे.
