नागपूर-अमरावती महामार्गावर अपघात, CM शिंदेंनी ताफा थांबवत जखमींना नेलं रूग्णालयात
नागपूर : नागपूर-अमरावती महामार्गावर झालेल्या अपघात एका जखमीसाठी CM शिंदे देवदूत ठरले आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत शिंदेंनी सूत्र हलवल्याने अपघातातील व्यक्तीचे प्राण वाचले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथील इकोनॉमीक एक्सप्लोझिव्ह लि. कंपनीत स्फोट झाला होता. यात नऊ कामगारांचा मृत्यू झाला होता. त्या ठिकाणी शिंदे भेट देण्यासाठी गेले होते. घटनेचा आढावा घेऊन नागपूरकडे परतत असताना गोंडखैरीच्या बस स्थानकाजवळ एक अपघात झाल्याचे शिंदेंच्या निदर्शनास आले.
घटनेचं गांभीर्य लक्षात घेत शिंदेंनी तात्काळ ताफा थांबवत गाडीतून खाली उतरत जखमीला ताफ्यातील रुग्णवाहिका देत ते स्वतः नागपुरातील रवी नगर चौकातील सेनगुप्ता रुग्णालयात घेऊन आले. गिरीश केशरावजी तिडके असे जखमीचे नाव असून, तो नागपूरच्या गोंड खैरीवाडी येथील रहिवासी आहे. गिरीशशिवाय या अपघातात वंदना राकेश मेश्राम (सिद्धार्थ नगरवाडी, नागपूर), रंजना शिशुपाल रामटेके (रा. रामबाग मेडिकल चौक, नागपूर) आणि शुद्धधन बाळूजी काळपांडे (रा. मौदा नागपूर) या व्यक्तीदेखील जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावरदेखील सध्या रूग्णालयात उपचार केले जात आहेत.
या तरुणाला बाहेर काढण्यापासून त्याला रुग्णालयात दाखल करेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः रुग्णालयात उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी स्वतः पालक बनून या जखमी रुग्णांना तत्काळ रुग्णालयात दाखल केल्यामुळे हे सर्व प्रवासी सुरक्षीत असून त्यांची प्रकृती आता स्थीर आहे. मुख्यमंत्र्यांनी समयसूचकता दाखवून केलेल्या या मदतीबद्दल या रुग्णांच्या कुटूंबियांनी त्यांचे आभार मानले आहेत.