“शरद पवारांचे आभार, त्यांनी वर्ध्यातून पंजा गायब केला”; फडणवीसांचा खोचक टोला

“शरद पवारांचे आभार, त्यांनी वर्ध्यातून पंजा गायब केला”; फडणवीसांचा खोचक टोला

Devendra Fadnavis Comment on Sharad Pawar : ‘काल पवार साहेब या ठिकाणी येऊन गेले. मी पवार साहेबांचे मनापासून आभार मानतो. जी गोष्ट आम्हाला जमली नाही ती पवार साहेबांनी करून दाखवली. आम्ही काँग्रेसमुक्त वर्धाचा नारा दिला. जिल्हा परिषद जिंकलो. एक सोडून सगळ्या आमदारकीच्या जागा जिंकल्या. नगरपालिका जिंकलो, नगरपरिषद जिंकलो. पण आम्हाला पंजा मात्र गायब करता आला नाही. पवार साहेबांचे मनापासून आभार की पवार साहेबांनी वर्ध्यातून पंजा गायब करून दाखवला. जे आमचं स्वप्न होतं ते पवार साहेबांनी पूर्ण केलं.’ अशा खोचक शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) शरद पवारांवर टीका केली.

वर्ध्यात आज महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेत त्यांनी काँग्रेसवर आणि शरद पवार यांच्यावर खोचक टीका केली. ते पुढे म्हणाले, ज्या महात्मा गांधींचं नाव सांगून काँग्रेसनं इतकी वर्ष राजकारण केलं. त्या महात्मा गांधींच्या वर्ध्यातून काँग्रेसला हद्दपार करण्याचं काम शरद पवार साहेबांनी करून दाखवलं. म्हणून आपण सगळे त्यांचे मनापासून आभार मानू. आता काय दिवस आले पहा, काँग्रेस तर हद्दपार झालीच आता त्यांना उमेदवार सुद्धा सापडत नाहीत. पण एक गोष्ट नक्की आहे ती म्हणजे गांधींजींचं वर्धा ना काँग्रेसचं ना शरद पवारांचं ते मोदींजींचं आणि भाजपाचं यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे.

दरम्यान, महायुतीने वर्धा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार रामदास तडस यांनाच पुन्हा तिकीट दिले आहे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि अन्य नेत्यांच्या उपस्थितीत तडस यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

तडसांचा चेहरा भोळा पण असा डाव टाकतात की समोरचा चितपट 

रामदास तडस कायम सामान्य माणसांत फिरत राहिले. हा असा एक खासदार होता की जो सातत्याने लोकांना उपलब्ध होता. त्यामुळे जनतेचे प्रेम त्यांना मिळाले. तसेही रामदास तडस पहिलवान आहेत त्यात राष्ट्रीय कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्षही आहेत. त्यांनी कुणाचं पॅनेल हरवलं माहिती आहे का. इतकी वर्ष ज्यांच्याकडे राष्ट्रीय कुस्तीगीर परिषदेचं नेतृ्त्व होतं त्या शरद पवारांचं पॅनल. आमच्या पहिलवानानं असा डाव टाकला की त्यांच्या हातातून कुस्तीगीर परिषद निघाली आणि तडस साहेबांच्या हातात आली. सर्व डावपेच त्यांना माहिती आहेत. चेहरा भोळा आहे पण त्यावर जाऊ नका. वेळप्रसंगी असा धोबीपछाड मारतात की समोरचा चितपट झाल्याशिवाय राहत नाही, अशा शब्दांत फडणवीस यांनी महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांचे कौतुक केले.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज