सावधान! विदर्भात येणार उष्णतेची लाट, ‘या’ भागात पावसाच्या सरी; हवामानाचा अंदाज काय?

Maharashtra Weather News : राज्यात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. एप्रिल महिन्यात (Maharashtra Weather) तापमानात मोठी वाढ झाली आहे. दुपारच्या वेळी तर सूर्य अक्षरशः आग ओकू लागला आहे. या कडाक्याच्या उन्हाने नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. विदर्भाती अकोला येथे सर्वाधिक म्हणजे 44.1 अंश तापमानाची नोंद झाली. पुढील 24 तासांच्या हवामानाचा अंदाज घेतला तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे. कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट स्थिती राहील. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल.
मराठवाड्यातील जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी सायंकाळनंतर तापमान वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथेही काही दिवसात उष्णतेत मोठी वाढ होणार आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पारा चाळीशीपार गेला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांतही अशीच परिस्थिती आहे. पुढील 24 तासांत मुंबईत उष्ण व दमट हवामान राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
सावध व्हा! घराबाहेर पडताना विचार करा, ‘या’ भागांत सूर्य ओकतोय आग; तापमानात वाढ
देशभरातील तापमानात वाढ होत आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरातसह 9 राज्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राजस्थानच्या सीमा भागात सर्वाधिक म्हणजे 45.6 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. याच भागात देशातील सर्वात उष्ण ठिकाण आहे असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या उष्णतेचा परिणाम महाराष्ट्रातही होताना दिसत आहे.
एप्रिल महिन्यात उष्णता वाढणार
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते जून या काळात देशातील बहुतांश भागात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील असा अंदाज आहे. राज्यात अनेक ठिकाणी तापमान जास्त राहील. राज्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटा येतील अशी स्थिती आहे. एप्रिल महिन्यात राज्यातील तापमान जास्त राहणार आहे असा इशारा देण्यात आला आहे. मार्च महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उष्णतेचा त्रास फारसा जाणवला नाही. परंतु, आता एप्रिल महिना सुरू झाला असून तापमानात रोजच वाढ होताना दिसत आहे.