ब्राह्मण पुरोहितांना हटवून बहुजनांचे पुजारी नेमा; मराठा सेवा संघ आक्रमक
यवतमाळ : नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरातील (Kalaram temple) पुजाऱ्यांनी छत्रपती संभाजीराजेंच्या पत्नी संयोगिता राजे (Sanyogita Raje) यांना वेदोक्त मंत्र म्हणण्यापासून रोखण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणावरुन राज्यातील राजकारण तापले आहे. या प्रकरणावरुन मराठा सेवा संघाचे (Maratha Seva Sangha) अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर (Purushottam Khedekar) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी या घटनेचा निषेध करत राज्यातील सर्व हिंदू मंदिरातील ब्राह्मण पुरोहितांना हटवून बहुजन समाजातील मुले-मुली पुजारी आणि सेवक पदावर नेमण्याची मागणी केली आहे .
पुरुषोत्तम खेडेकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले की, नाशिक येथील काळा राम मंदिरातील सर्व पुरोहित भटजी ब्राह्मण वर्गाचा मराठा सेवा संघाकडून जाहीर निषेध केला जात आहे . सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी असेच वेदोक्त प्रकरण राजर्षी शाहू महाराज यांच्या बाबतीत कोल्हापूर येथे निर्माण झाले होते. पण आता भारतीय संविधान आणि लोकशाहीच्या राज्यात पुन्हा एकदा त्याच घराण्यातील युवराज्ञी संयोगिता राजे यांना तशाच विधी प्रकरणाला तोंड द्यावे लागते ही बाब गंभीर असून संविधान विरोधी आहे. छत्रपती घराण्याच्या बाबतीत जर असे प्रकार घडत असतील तर सामान्य जनतेच्या बाबतीत किती क्रुरपणा होत असेल याची कल्पनाही करवत नाही.
छत्रपती संभाजीनगरच्या दंगलीत पीएफआय कनेक्शन? दंगलीतील आत्तापर्यंत 28 जण अटकेत
त्यांनी पुढं म्हटले की, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व हिंदू मंदिरातील वंश परंपरागत सुरू असलेली भटजी पुरोहित ब्राह्मण यांची विधी व अन्य मक्तेदारी संपुष्टात आणावी . तसेच सर्व मंदिरात भाविकांची गर्दी व कुचंबणा टाळण्यासाठी मंडल आयोगाच्या नुसार बहुजन समाजातील पुजारी नेमावेत. श्री विठ्ठल मंदिर पंढरपूर येथे अशी सुविधा उपलब्ध झाली आहे. तरी राज्यभरातील सर्व लहानमोठ्या मंदीरात बहुजन समाजातील पुजारी व सेवक नेमण्याची प्रक्रिया त्वरित हाती घेण्यात यावी. अन्यथा हा भारतीय संविधानाचा अपमान होत आहे, असे मानले जाईल.
युवराज्ञी संयोगिता राजे यांच्या वेदोक्त प्रकरणामुळे महाराष्ट्रातील सर्व हिंदू मंदिरामध्ये सरसकट सर्व हिंदू समाजातील स्त्री व पुरुष यांना मुक्त प्रवेश मिळण्यासह तेथे बहुजन समाजातील स्त्रिया व पुरुष यांना पुजारी व सेवक पदावर नेमण्याची मागणी आहे. महाराष्ट्रात वाढलेली बेरोजगारी पाहता सर्वच मंदिरात बहुजन पुजारी व सेवक नियुक्त केले तर कमीत कमी दोन लाख रोजगार उपलब्ध होईल. याची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विशेष कायदा व नियम करावेत अशी मराठा सेवा संघ जाहीर मागणी करत आहे . तसेच यासाठी सर्वांनीच एकत्रित येऊन मोठे जनआंदोलन करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे पुरुषोत्तम खेडेकर यांनी म्हटले आहे.