…तर धीरेंद्र महाराजांच्या पायावर डोकं ठेवणार, श्याम मानव यांचं धीरेंद्र महाराजांना पुन्हा आव्हान

…तर धीरेंद्र महाराजांच्या पायावर डोकं ठेवणार, श्याम मानव यांचं धीरेंद्र महाराजांना पुन्हा आव्हान

नागपूर : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक श्याम मानव (Shyam Manav) यांनी धीरेंद्र महाराजांना (Dhirendra maharaj) पुन्हा एकदा आव्हान दिलंय. महाराजांनी दिव्यशक्ती सिद्ध करण्याचं 30 लाख रुपयांच्या बक्षिसाचं आव्हान दरबारात नाही, तर नागपुरात पत्रकार आणि पंचसमितीच्या समक्ष स्वीकारण्याचं आव्हान दिलंय. धीरेंद्र महाराज यांनी त्यांचे दावे सिद्ध केल्यास मी धीरेंद्र महाराजांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागणार असल्याचं जाहीर केलंय. श्याम मानव यांनी शनिवारी (दि.21) एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली.

त्यावेळी श्याम मानव म्हणाले की, धीरेंद्र महाराजांच्या दाव्यांना अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं रितसर वैज्ञानिक कसोट्यांवर आव्हान दिलंय. आम्ही पत्रकार परिषद घेऊन लिखित स्वरुपात हे आव्हान दिलं आहे. या आव्हानाच्या अटी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कारण हे दावे करताना माहिती गोळा करण्याची यंत्रणा वापरली जाते. तशाचप्रकारे आम्ही अनेक बाबांच्या दाव्यांचा पर्दाफाश केलाय.

मानव यांनी सांगितले की, कोणत्याही यंत्रणेच्या माध्यमातून दावा करणाऱ्यांपर्यंत माहिती पोहचू नये, याची काळजी घेऊन ही आव्हान प्रक्रिया वैज्ञानिक कसोट्यांवर आयोजित करावी लागते. त्यासाठी आम्ही स्पष्टपणे म्हटलंय की, ही आव्हान प्रक्रिया महाराजांच्या दरबारात पार पडणार नाही. ही प्रक्रिया नागपूरमधील सर्व पत्रकारांसमोर होईल. त्यासाठी एक तटस्थ पंचसमिती नेमली जाणार असल्याचं श्याम मानव यांनी सांगितलंय.

महाराजांचा दरबार आयोजित करणारे संयोजक आणि आम्ही एकत्र बसून नागपुरातील अशा पाच तटस्थ लोकांना निवडणार आहेत. त्यात निवृत्त न्यायाधीशांचाही समावेश असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. त्या पंचसमितीसमोर ही आव्हान प्रक्रिया दोनदा पार पडणार आहे. पहिल्यांदा आम्ही त्यांच्या पुढे अचानक 10 माणसं उपस्थित करू. त्या माणसांना पाहून या महाराजांनी नाव, वय, वडिलांचं नाव आणि त्यांचा मोबाईल नंबर सांगायचा आहे, असंही त्यांनी सांगितलंय.

माणसांची ओळख सुरु असेल त्याच्याच बाजूच्या रुममध्ये आम्ही 10 वस्तू ठेऊ. त्याचं व्हिडीओ रेकॉर्डिंग होत राहील. महाराजांनी त्या 10 वस्तू ओळखायच्या आहेत. ही प्रक्रिया दोनदा पार पाडली जाईल. माणसाच्या हातून चुका होऊ शकतात, पण दिव्यशक्ती 100 टक्के खरी ठरते. त्यामुळं दिव्यशक्तीच्या हातून चुका होण्याचं काही कारण नाही, असं श्याम मानव यांनी म्हटलंय. महाराजांना दोन्ही वेळा 90 टक्के माहिती बरोबर सांगता आली तर त्याचा अर्थ त्यांच्यात दिव्यशक्ती आहे, असं मान्य करु, त्यांना दिव्यशक्ती प्रसन्न आहे. त्यानंतर आम्ही त्यांना आमच्या समितीचं 30 लाख रुपयांचं बक्षीस देऊ असही त्यांनी सांगितलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube