बंगालमधील हिंसाचार हा संविधानाचा अपमान; आशीष शेलार यांचा घणाघात

Ashish Shelar : संविधानाच्या चौकटीत राहून, लोकशाही मुल्यांनुसार, नियमानुसार लागू केलेल्या वक्फ कायद्याचा विरोध करायचा तर लोकशाही पद्धतीने करा, कोर्टाचा दरवाजा ठोठावा. पण पश्चिम बंगालमध्ये धार्मिक भावना भडकावून हिंसा, हिंदूंची हत्या करत कायद्याला विरोध म्हणजे संविधानाचा अपमान आहे, असा घणाघात शनिवारी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशीष शेलार (Ashish Shelar) यांनी शनिवारी केला. पश्चिम बंगालमधील हिंदू नरसंहारा विरोधात भारतीय जनता पार्टीच्या बंगाली प्रकोष्ठच्या वतीने प्रदेश कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी ॲड. शेलार बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते विजय तथा भाई गिरकर, बंगाली प्रकोष्ठ चे संयोजक रंजन चौधरी, सुभागत दास, सरचिटणीस निरंजन बोस, मिरा रोडच्या प्रकोष्ठच्या महिला अध्यक्ष मंजुला बसक, रहिम दत्ता आदी उपस्थित होते. प. बंगालमध्ये हिंदूंच्या रक्षणासाठी राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी भाजपा बंगाली प्रकोष्ठच्या वतीने यावेळी करण्यात आली.
यावेळी ॲड. शेलार म्हणाले की ममता सरकार हिंदूंवर करत असलेल्या निर्घृण अत्याचाराविरोधात भाजपा उभी आहे. आतंकवादाला धर्म नसतो अस म्हणतात पण मग दहशतवादी हल्ल्यात एका विशिष्ट धर्माचे लोकच का असतात असा खरमरीत सवाल ही यावेळी ॲड. शेलार यांनी केला. हिंदू एकजूट होताना दिसले की लगेच जाती भेद निर्माण करून वाद निर्माण करणाऱ्या नेत्यांत महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते ही सामील आहेत असे म्हणत ॲड. शेलार यांनी शरद पवार यांच्यावरही शरसंधान केले.
पहलगाम हल्ल्यातील सर्व गुन्हेगारांना मोदी सरकार कडक शासन देईल यात शंकाच नाही असेही त्यांनी नमूद केले. प. बंगालमधील ममता सरकारच्या लांगूलचालनाच्या राजकारणामुळे कट्टरतावादी शक्तींना प्रोत्साहन मिळत असून तेथे राजरोसपणे हिंदूंवर अत्याचार होत आहेत. मुर्शिदाबाद घटना अत्यंत निंदनीय आहे. तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि हिंदूंना सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी शनिवारी भाजपा बंगाली प्रकोष्ठच्या वतीने करण्यात आली.
… तर कारवाई करु, CM फडणवीसांचा ‘त्या’ प्रकरणात आमदार संजय गायकवाडांना इशारा
यावेळी ‘ममता सरकार मुर्दाबाद’, ‘ममता राजीनामा दो’, राष्ट्रपती शासन लागू करो अशा घोषणा देत नराधम ममता सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. मुर्शिदाबाद येथील हिंसाचारात आणि पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तिंना श्रद्धांजली म्हणून 2 मिनिटे मौन पाळण्यात आले.