शिवसेना-राष्ट्रवादीची वेसन फडणवीसांच्या हाती… प्रत्येक टप्प्यावर लावलीय फिल्डिंग

शिवसेना-राष्ट्रवादीची वेसन फडणवीसांच्या हाती… प्रत्येक टप्प्यावर लावलीय फिल्डिंग

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) किती कसलेले प्रशासक आहेत, याचा रोज नवीन अनुभव राज्याला येत आहे. तीन पक्षांचे सरकार असले तरीही दोन्ही सहकारी पक्षांना कंट्रोल करण्यासाठी त्यांनी प्रत्येक टप्प्यावर फिल्डिंग लावली आहे. शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादीतील (NCP) मंत्र्यांवर, आमदारांवर वॉच एकढा जबरदस्त लावला आहे की त्यांना फारशी हालचाल करायला वावच उरत नाही. या आमदारांच्या मतदारसंघातील आणि मंत्र्यांच्या मंत्रालयांमधील कामांशी संबंधित प्रत्येक गोष्ट आपल्यापर्यंत कशी पोहोचेल याची तजबीज फडणवीस यांनी केलेली दिसत आहे. (Chief Minister Devendra Fadnavis has gained control over the administration and its allies Shiv Sena and NCP.)

शिवसेना आणि राष्ट्रवादीला शह देण्यासाठी नेमके फडणवीस यांनी काय केले आहे?

देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यात पहिल्यांदा मुंबईत मंत्र्यांच्या मंत्रालयातील कामकाजावर कसे लक्ष कसे राहील हे बघितले. यासाठी त्यांनी जबाबदारी दिली ती त्यांचे अत्यंत विश्वासू अधिकारी चंद्रशेखर वझे यांच्यावर. वझे हे फडणवीस यांचे ओएसडी देखील आहेत. यापूर्वी फडणवीस उपमुख्यमंत्री असतानाही ते वझे ओेएसडी होते. मंत्र्यांना दिले जाणारे स्वीय सचिव आणि स्वीय सहाय्यक भ्रष्ट नकोत, कामाचेच हवेत. शिवाय मंत्रालयातील कामकाजाचीही बित्तंबातमी मिळाली पाहिजे असा फडणवीस यांचा अग्राह आहे. यासाठीही वझे यांनी जवळपास 300 जणांच्या मुलाखती घेतल्याचे सांगण्यात येते. वझे यांचा कॉर्पोरेट क्षेत्राचा अनुभव दांडगा आहे. ते उजव्या परिवारातल्या सर्व महत्त्वाच्या व्यक्तींच्या संपर्कात असतात. त्यांनी एकेका अधिकाऱ्याला निवडताना फार कटाक्षाने निकष चाचण्या लावल्या.

फडणवीस यांनी दुसरी चाल खेळली ती कोल्हापूरमध्ये सह पालक मंत्री नेमून. खरंतर सह पालकमंत्री ही संकल्पनाच मुळात फडणवीस यांनी जन्माला घातलेली. फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात ही सुपीक कल्पना त्यांच्या डोक्यातून बाहेर आली होती. ज्या दोन मंत्र्यांमध्ये जिल्ह्याच्या कारभाराबाबत संघर्ष घडू शकतो त्या दोघांचेही समाधान अशाप्रकारे त्यांनी केले होते. यातून सातारा जिल्ह्याचे सहपालकमंत्रिपद सदाभाऊ खोत, धाराशिवचे सह पालकमंत्री पद महादेव जानकर यांना तर शिवसेनेचे संजय राठोड यांना यवतमाळचे सहपालकमंत्रिपद देण्यात आले होते. आता कोल्हापूरमध्ये सहपालकमंत्री नेमून फडणवीस यांनी जिल्ह्याची वेसन आपल्या हाती ठेवली आहे.

जिल्ह्यात शिवसेनेचे राजेश क्षीरसागर, प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरके आणि सहयोगी राजेंद्र पाटील–यड्रावकर असे चार आमदार आहेत. तर भाजपचे अमल महाडिक, राहुल आवाडे असे दोन, सहयोगी जनसुराज्य शक्ती पक्षाचे डॉ. विनय कोरे, अशोकराव माने, तर अपक्ष शिवाजी पाटील असे पाच आमदार आहेत. तर राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ हे एकमेव आमदार आहेत. सर्वाधिक आमदार या फॉर्म्युल्यानुसार कोल्हापूरचे पालकमंत्री पद शिवसेनेला मिळाले. पण सहपालकमंत्री पद भाजपने आपल्याकडे ठेवले. इतर जिल्ह्यांमध्ये भाजप सशक्त झाला आहे. पण आज घडीला भाजपाला सर्वाधिक ताकद वाढीची गरज कोणत्या जिल्ह्यात असेल तर तो कोल्हापूर.

भाजपने 2009 च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन आमदार सुरेश हाळवणकर यांच्या रुपाने प्रथमच प्रवेश केला. 2014 च्या निवडणुकीत सुरेश हाळवणकर आणि अमल महाडिक असे दोन आमदार मिळाले. जिल्ह्यात भाजपची गाडी प्रगतीपथावर असताना 2019 च्या निवडणुकीत या दोन्ही आमदारांचा पराभव झाला. लोकसभेला हातकणंगले आणि कोल्हापूर या दोन्ही जागा कायम शिवसेनेकडे राहिल्या. त्यामुळे जिल्ह्यात भाजपची पुन्हा पिछेहाट झाली. अशात धनंजय महाडिक यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाला इथून चांगले बळ मिळाले. त्यांना राज्यसभेवर संधी देण्यात आली.

आता 2024 च्या निवडणुकीतही केवळ दोनच आमदार निवडून आले आहेत. पण यापैकी एकालाही मंत्रीपद मिळालेली नाही. त्यामुळे भाजपची जिल्ह्यातील घोडदौड पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कायम ठेवण्यासाठी आणि शिवसेनेवर अप्रत्यक्ष रित्या अंकुश ठेवण्यासाठी सह पालक मंत्री पदाच्या माध्यमातून भाजपने ही खेळी केली का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.

माझी आई वडिलांचा बदला घेतेय, तिला आर्थिक विवंचना नाहीत; करुणा शर्मांच्या मुलाचाच मोठा दावा

फडणवीस यांनी यानंतर तिसरी चाल खेळली ती संपर्क मंत्री नेमून. भाजपने बुधवारी 17 जिल्ह्यांत संपर्कमंत्र्यांची नेमणूक केली. ज्या जिल्ह्यांत भाजपचा पालकमंत्री नाही, त्या जिल्ह्यांत संपर्कमंत्री दिले आहेत. पक्ष आणि सरकारमध्ये समन्वय ठेवण्यासाठी या नियुक्त्या करण्यात आल्याची माहिती भाजपकडून देण्यात आलेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री असलेल्या ठाणे आणि मुंबई शहर या दोन जिल्ह्यांत भाजपाने अनुक्रमे वनमंत्री गणेश नाईक यांची, तर कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांची नेमणूक केली आहे.

गणेश नाईक आणि शिंदे यांच्यामधून विस्तवही जात नाही. नाईक यांनी यापूर्वी ठाण्यात जाऊन ओन्ली कमळ म्हणत जनता दरबार घेण्याची घोषणा केली होती. शिंदेंना थेट अंगावर घेणाऱ्या नाईक यांच्यामागे आता संपर्क मंत्रिपदाचीही ताकद उभी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री असलेल्या पुणे जिल्ह्यात चंद्रकांत पाटील संपर्कमंत्री असणार आहेत. तर बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्याकडे ही जबाबदारी दिली आहे. रायगडमध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार, जळगावमध्ये गिरीश महाजन, नंदुरबारमध्ये जयकुमार रावल यांच्याकडे संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे.

आमच्या 7 आमदारांना 15 कोटींची ऑफर, बड्या नेत्याचा भाजपवर खळबळजनक आरोप

गोंदियामध्ये पंकज भोयर, बुलढाण्यात आकाश फुंडकर, यवतमाळला अशोक उईके, वाशिमला राधाकृष्ण विखे पाटील, छत्रपती संभाजीनगरमध्ये अतुल सावे, धाराशिवला जयकुमार गोरे, हिंगोलीमध्ये मेघना बोर्डीकर, साताऱ्यात शिवेंद्रराजे भोसले आणि कोल्हापूरला माधुरी मिसाळ यांची संपर्कमंत्री म्हणून नियुक्ती झाली आहे. पण केवळ मित्रपक्षांचे पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यांमध्येच संपर्क मंत्र्यांची नियुक्ती का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यातून मित्रपक्षांकडे गेलेल्या जिल्ह्यांमध्ये भाजप आपली समांतर यंत्रणा निर्माण करतोय का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. आता नजीकच्या काळात शिंदे आणि अजित पवार यांच्याकडूनही जिल्हा संपर्कमंत्री नेमले जाण्याची शक्यता आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube