लग्नाचा वाढदिवस…सेलिब्रेशन सुरु होतं अन् क्षणात दुःखाचा डोंगर कोसळला

Untitled Design   2023 05 09T075918.128

Vishwanath Mahadeshwar Passed Away : ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि मुंबईचे माजी महापौर तसेच उद्धव ठाकरेंचे जवळचे विश्वासू अशी ओळख असलेले विश्वनाथ महाडेश्वर यांचे आज मंगळवारी पहाटे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना मोठा धक्का बसला आहे. यामध्येही सगळ्यात दुःखाची बातमी म्हणजे विश्वनाथ महाडेश्वर आणि त्यांच्या पत्नी पूजा महाडेश्वर यांच्या लग्नाचा आज मंगळवारी रोजी वाढदिवस होता. यानिमित्ताने कुटुंबीय एकत्र आले. सेलिब्रेशन सुरु होते अन तोच महाडेश्वरांची तब्येत बिघडली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले अन काही क्षणात त्यांनी जगाचा निरोप घेतला.

कुटूंबियांच्या आनंदावर दुःखाचे विरजण
63 वय वर्षे असलेल्या महाडेश्वर हे उद्धव ठाकरेंचे अत्यंत जवळचे सहकारी मानले जात होते. दरम्यान महाडेश्वर यांच्या लग्नाचा आज वाढदिवस होता. यानिमित्ताने त्यांच्या घरी सेलिब्रेशनची तयारी देखील सुरु होती. महाडेश्वर यांची मुलगी आणि इतर नातेवाईक हे देखील वाढदिवसानिमित्त त्यांच्या सांताक्रूझ येथील घरी आले होते. हे सर्वत्र एकत्र जमून आनंद साजरा करत असतानाच विश्वनाथ महाडेश्वर यांची प्रकृती खालावली. त्यांना तातडीने व्ही.एन.देसाई या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांनी आज अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांसह ठाकरे गटाचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान महाडेश्वरांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी सांताकृझ पूर्व, पटेल नगर सर्विस रोड इथल्या राजे संभाजी विद्यालयात दुपारी 2 वाजता ठेवण्यात येईल. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता विश्वनाथ महाडेश्वर यांची अंत्ययात्रा निघेल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दुपारी अंत्यदर्शनासाठी जाणार आहेत.

महाडेश्वरांची राजकीय कारकीर्द
विश्वनाथ महाडेश्वर यांनी 2017 ते 2019 दरम्यान मुंबईचं महापौरपद भूषवलं होते. तसेच महाडेश्वर यांनी 2003 बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून काम पहिले आहे. ते स्थायी समितीचे सदस्य होते. 2007 बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले. तर 2012 बृहन्मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक म्हणून पुन्हा निवडून आले. 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत वांद्रे पूर्व मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला होता. शिवसेनेच्या माजी आमदार तृप्ती सावंत यांची बंडखोरी त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube