Nashik Graduate Constituency : तांबेंनंतर आता थोरातांची खेळी

Nashik Graduate Constituency : तांबेंनंतर आता थोरातांची खेळी

अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीत सत्यजीत तांबे यांनी सहज विजय मिळविला. त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव केला. ही निवडणूक सत्यजीत तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे राज्यभर चर्चेत आली. काँग्रेसकडून तांबे पिता-पुत्रांवर कारवाईचा बडगा उगारला गेला तरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व सत्यजीत तांबे यांच्या मामा बाळासाहेब थोरात यांच्या मौन नवी राजकीय खेळी असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

सत्यजीत तांबे हे युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत. जिल्हा परिषद सदस्य ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. २०१४मध्ये त्यांनी अहमदनगर शहरातून विधानसभा निवडणूक लढविली होती. मात्र त्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. तेव्हा पासूनच त्यांच्यासाठीच्या जागेचा शोध सुरू होता. सत्यजीत तांबे यांचे वडील डॉ. सुधीर तांबे हे सलग तीन वेळा नाशिक पदवीधर मतदार संघातून आमदार राहिले.

तर आई दुर्गा तांबे या संगमनेरच्या नगराध्यक्षा आहेत. त्यामुळे सत्यजीत तांबे संगमनेरमधून निवडणूक लढवतील अशी चर्चा अधून-मधून होत होती. अशातच नाशिक पदवीधर मतदार संघासाठी काँग्रेसने पुन्हा सुधीर तांबेंना उमेदवारी जाहीर केली. ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नाशिकला गेले. त्याच वेळी सत्यजीत तांबे यांनी अचानक अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. आणि त्यांचा जागेचा प्रश्न सुटला.

बाळासाहेब थोरात यांच्या उत्तराधिकारी म्हणून डॉ. जयश्री बाळासाहेब थोरात-जैन यांच्याकडे पाहिले जात आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत त्या सहभागी झाल्या. त्यांचा हा सहभाग त्यांचे लॉंचिंग असल्याचे बोलले जाते. जोर्वे ग्रामपंचायत निवडणूक नुकतीच झाली. या निवडणुकीत त्या राजकारणात सक्रिय झाल्याच्या दिसल्या. मात्र या निवडणुकीत थोरात गटाला सरपंचपद गमवावे लागले होते.

मात्र, त्यावेळेस पासूनच जयश्री थोरातांकडे बाळासाहेब थोरातांचे उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात आहे. सत्यजीत तांबेंना आमदार होण्यासाठी मतदार संघाची गरज होती. ही गरज त्यांनी वडिलांची जागा लढवत मिळविली. तर बाळासाहेब थोरातांची जागा लढविण्यासाठी जयश्री थोरातांचा मार्ग त्यांनी मोकळा केला असल्याचे बोलले जात आहे. सत्यजीत तांबे यांनी राजकीय खेळी खेळण्यापूर्वीच बाळासाहेब थोरात रुग्णालयात दाखल झाले. तांबे पिता-पुत्रांवर कारवाई होत असताना थोरातांनी रुग्णालयातून शब्दही बाहेर काढला नाही.

महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या प्रचारासाठी अहमदनगरमध्ये आलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मी व थोरात यांच्या १२ जानेवारीला चर्चा झाली होती. काय चर्चा झाली हे मी गुलदस्त्यात ठेवेल. तांबे पिता-पुत्र अर्धसत्य सांगत आहेत, असे सूचक वक्तव्य केले. तर सत्यजीत तांबे यांनी मला पूर्ण सत्य माहिती आहे. मी विजयानंतर पूर्ण सत्य सांगेल, असा पलटवार केला होता. या दोन्ही वक्तव्यांवर सध्या उलटसूलट चर्चा सुरू आहे.

सत्यजीत तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीला काँग्रेसमधील थोरातांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी उघड पाठिंबा दिला. यात काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, प्रदेश कार्यकारिणीतील सहसचिव दीप चव्हाण आदींचा समावेश आहे. हे निष्ठावान कार्यकर्ते थोरातांबरोबर प्रत्येक वेळी राहिले आहेत. त्यामुळे सत्यजीत तांबे यांची अपक्ष उमेदवारी थोरातांची मुलीसाठीची खेळी असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube