अहमदनगर महाकरंडक एकांकिका स्पर्धा उद्यापासून
अहमदनगर : महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी एकांकिका स्पर्धा म्हणून ओळख असलेली ‘अहमदनगर महाकरंडक २०२३’ ही एकांकिका स्पर्धा ११ ते १४ जानेवारी रोजी सकाळी १० ते रात्री ९ यावेळेत अहमदनगर येथील माऊली सभागृहात होत आहे. यंदाचं स्पर्धेचं हे दहावं वर्ष आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातील २७ संघ सहभागी झाले आहेत.
अनुष्का मोशन पिक्चर्स अॅण्ड एंटरटेन्मेंट, शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन प्रायोजित, श्री महावीर प्रतिष्ठान आयोजित, आय लव्ह नगरच्या संयुक्त विद्यमाने आणि कलर्स मराठी वाहिनीच्या सहयोगाने ही स्पर्धा पार पडणार आहे.
लेट्सअप हे या स्पर्धेचे डिजिटल पार्टनर आहेत. या एकांकिका स्पर्धेचं यंदाचं उत्सव रंगभूमीचा, अभिमान दशकपूर्तीचा हे ब्रीदवाक्य आहे. कलर्स मराठी वाहिनीचा सहयोग यंदाच्या अहमदनगर महाकरंडक एकांकिका स्पर्धेला लाभला आहे.
या स्पर्धे विषयी अहमदनगर महाकरंडक समितीचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी सांगितले की, “ यंदा प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या एकांकिकेला अहमदनगर महाकरंडक आणि प्रमाणपत्रासह १ लाख ५१ हजार १११ रुपये रोख बक्षीस तर इतर एकूण ५ लाखांहून अधिक रोख रकमेचे पारितोषिक दिले जाणार आहे.
दिग्दर्शक- रंगकर्मी पुरुषोत्तम बेर्डे, लोकप्रिय अभिनेते विजय पाटकर व अभिनेत्री प्रतीक्षा जाधव हे यंदाच्या स्पर्धेचे परीक्षक असतील,” असे त्यांनी सांगितले.
कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील लतिका म्हणजेच अक्षया नाईक हिच्या हस्ते बुधवारी (ता. ११) स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.
१२ जानेवारीला ‘शेतकरीचं नवरा हवा’ या मालिकेतील सयाजी व रेवा म्हणजे प्रदीप घुले व ऋचा गायकवाड, पारितोषिक वितरणाच्या दिवशी (ता. १४) ‘प्रितीचा वनवा उरी पेटला’ मालिकेतील सावी व अर्जुन म्हणजे रसिका वखारकर व इंद्रनील कदम तसेच ‘जीव माझा गुंतला’मधील अंतरा व मल्हार म्हणजेच योगिता चव्हाण व सौरभ चौघुले उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह द्विगुणीत करणार आहेत.
या पूर्वी ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर, मिताली मयेकर, अद्वैत दादरकर, शिवराज वायचळ, पार्थ भालेराव, सखी गोखले, ओंकार राऊत, योगेश शिरसाट या आणि इतर अनेक कलाकारांनी या स्पर्धेतून आपली कला सादर केली आहे.