अहमदनगर जिल्ह्यात दोन दिवस थंडीची लाट
अहमदनगर : जिल्ह्यासह मध्य, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दोन दिवस थंडीची लाट राहणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. त्यानुसार अहमदनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
उत्तर भारतातील थंडीची लाट पाहता भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्रातील सोलापूर व पुणे जिल्ह्यात, उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात तर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट राहणार असल्याचे सांगितले आहे.
अतिथंडी प्राणघातक ठरू शकते त्यामुळे उबदार कपडे वापरण्याचा सल्लाही प्रशासनाने दिला आहे. महाराष्ट्रातही तापमानाचा पारा चांगलाच घसरलाय. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 10 ते 12 अंश सेल्सिअसच्या दरम्यान पाहायला मिळतंय. काही ठिकाणी एक अंकी तापमानाची नोंद झालीय.
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसात उत्तर मध्य महाराष्ट्राचा काही भाग, संलग्न मराठवाडा भाग तसेच बहुतांश विदर्भात तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
थंडीचा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट येण्याचा अंदाज आहे. पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव काही भागातही थंडी वाढण्याचा अंदाज आहे.