‘पृथ्वीराज चव्हाण ‘तुतारी’वर लढण्यास तयार असतील तर’.. साताऱ्यासाठी शरद पवारांचा नवा डाव
Sharad Pawar on Satara Lok Sabha : राज्यात महाविकास आघाडीत ज्या मतदारसंघाची सर्वाधिक चर्चा होत आहे त्यात सातारा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात आघाडीला अजून उमेदवार शोधता आलेला नाही. याआधी शरद पवार यांनी (Sharad Pawar) खासदार श्रीनिवास पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. यानंतर दुसरा उमेदवार कोण द्यायचा असा प्रश्न होता. यावेळी समोर एकच नाव उभे राहिले ते म्हणजे पृथ्वीराज चव्हाण. मात्र, पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचा तुतारी चिन्हावर लढण्यास तयार होतील का हाच मोठा प्रश्न होता. झालेही तसेच काल माध्यमांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी माझ्या पक्षाने मला उमेदवारी करण्यास सांगितले तर मी तयार आहे असे सांगितले. या वक्तव्यातून ते तुतारी चिन्हावर लढतील याबाबत शंका उपस्थित होत होत्या. त्यानंतर आता शरद पवार यांनीही याबाबत मत व्यक्त केले आहे.
जर पृथ्वीराज चव्हाण आमच्या चिन्हावर लढण्यास तयार असतील तर त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. सातारा आणि माढा मतदारसंघातील उमेदवारांचा निर्णय झाला असून येत्या एक ते दोन दिवसांत निर्णय जाहीर करू, असे शरद पवार यांनी स्पष्ट सांगून टाकले. शरद पवार पुण्यात होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सातारा, भिवंडी आणि माढा मतदारसंघाबाबत माहिती दिली.
Sharad Pawar : कारवाईचा फायदा केजरीवालांनाच, भाजपच्या ‘त्या’ दोन जागाही येणार नाही; पवारांचा घणाघात
महाविकास आघाडीत भिवंडीच्या जागेवरूनही काही काळ तणाव होता. या जागेच्या बदल्यात साताऱ्याची जागा मिळेल असे काँग्रेसला वाटत होते. परंतु, असे काही झाले नाही. साताऱ्याची जागा आम्ही सोडणार नाही. जर पृथ्वीराज चव्हाण आमच्या चिन्हावर लढण्यास तयार असतील त्यांचा विचार होऊ शकतो, असे पवार यांनी स्पष्ट केले. याआधी पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्याच चिन्हावर निवडणूक लढण्याची तयारी असल्याचे सांगितले होते. परंतु, पवार यांनी त्यास सपशेल नकार दिला.
दरम्यान, आता सातारा मतदारसंघासाठी शरद पवार गटाकडून चार नावांची चाचपणी केली जात आहे. यामध्ये शशिकांत शिंदे, सत्यजित पाटणकर, बाळासाहेब पाटील आणि सुनील माने यांच्या नावावर चर्चा केली जात होती. यानंतर एकनाथ शिंदे गटाचे पुरुषोत्तम जाधव यांनीही शरद पवार गटाची भेट घेतली आहे. परंतु, या सगळ्यात पृथ्वीराज चव्हाण हेच प्रबळ दिसतात. जर त्यांनी तुतारी चिन्हावर लढण्यास नकार दिला तर शशिकांत शिंदे यांच्या नावावर शरद पवार गटाची सहमती होऊ शकते, अशी शक्यता दिसत आहे.
‘शरद पवारांचे आभार, त्यांनी वर्ध्यातून पंजा गायब केला’; फडणवीसांचा खोचक टोला