“जयंत पाटलांचे मन कशातच लागत नाही, त्यांनीच मला सांगितलं”, मुश्रीफांच्या दाव्याने खळबळ!

Hasan Mushrif on Jayant Patil : महाविकास आघाडीतील शरद पवार गटात सध्या अस्वस्थता वाढली आहे. यामागे कारणही आहे. निवडणुकीतील पराभव आणि त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पक्षांतराच्या वावड्या. अर्थात आपण पक्ष सोडणार नसल्याचे जयंत पाटील यांनी अनेकदा स्पष्ट केले असले तरी त्यांच्याबाबतीतला सस्पेन्स काही कमी होत नाहीत. आता तर मंत्री हसन मुश्रीफ यांनीच जयंत पाटील यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात जोरात चर्चा सुरू झाल्या आहेत. जयंत पाटील यांचे मन सध्या कशातच लागत नाही. नागपूर मुक्कामी असताना त्यांनीच ही गोष्ट आपल्याला सांगितली होती असा दावा मुश्रीफ यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं पानिपत झालं. शरद पवार गटाचीही दाणादाण उडाली. यानंतर आघाडीतील तिन्ही पक्षांतून आऊटगोइंग वाढले आहे. शरद पवार गटात जयंत पाटील यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरू आहेत. परंतु, नक्की अंदाज कुणालाच आलेला नाही. जयंत पाटील पक्ष सोडून जाणार नसल्याचे सांगत असले तरी त्यांच्या बद्दलच्या चर्चा काही थांबलेल्या नाहीत.
काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सांगली दौऱ्यावर होते. त्यावेळी देखील जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी उचल खाल्ली होती. अजित पवार गटात जाण्याच्याही चर्चा सुरू झाल्या होत्या. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिग्गज नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी जयंत पाटील यांच्याबद्दल चर्चा करून त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना बळ दिलं आहे.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत चाललंय काय; हसन मुश्रीफांनी वाशिमचं पालकमंत्रिपद सोडलं?
मुश्रीफ म्हणाले, जयंत पाटील यांनी एकदा मला नागपूर येथे एक गोष्ट बोलून दाखवली होती. ते म्हणाले होते, मुश्रीफ साहेब माझे मन सध्या कशातच लागत नाही. कदाचित सत्तेत नसताना पाच वर्षे पक्ष टिकवणे फार अवघड असल्याची कल्पना त्यांना आली असावी. पण आता त्यांचे खरंच मनपरिवर्तन झाले आहे का हे त्यांनाच विचारावे लागेल असे मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.
माझं काही खरं नाही : जयंत पाटील
राज्य सरकारच्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे. दोन दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी या आंदोलनाला भेट दिली होती. यावेळी बोलताना त्यांनी माझे काही खरे नाही, माझ्यावर विश्वास ठेऊ नका असे सूचक विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडणार का अशी चर्चान नव्याने सुरू झाली आहे.
पडळकर म्हणाले जयंतरावांनी बँक लुटली; जयंत पाटील म्हणाले एखाद्यानं भुंकायचं ठरवलं तर ते भुंकतात