Rohit Pawar : स्वतंत्र पालकमंत्री नसल्याने विकास खोळंबला; पालकमंत्र्यांवरून सरकारला डिवचले
अहमदनगर : एकाएका मंत्र्यांकडे तीन-तीन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिलीय. त्यामुळे डीपीसीच्या बैठका होत नाहीत. यामुळे जिल्ह्यातील विकास कामे खोळंबली आहेत, असा आरोप आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला.
स्वातंत्र पालकमंत्री नसल्याने डीपीसीच्या बैठका होत नाहीत. फक्त 30 टक्के निधी वापरला गेलाय. मार्च जवळ आलाय. आता घाईघाईने एखाद्याला खर्च करायचा असेल तर त्याचा पैसा वाया जाईल, असे रोहित पवार म्हणाले.
अजितदादा (Ajit Pawar) अर्थमंत्री असताना डीपीसीच्या माध्यमातून नगर जिल्ह्याला जो निधी मिळाला होता. त्यामध्ये आता दहा टक्के निधी कमी मिळाला आहे, असे आमदार रोहित पवार म्हणाले.
या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बैठक घेतली होती. गेल्या वर्षी कोरोना असताना जो निधी मिळाला होता त्यामध्ये 20 ते 25 कोटी कमी मिळत असतील तर ते योग्य नाही, असे आम्ही त्या बैठकीत फडणवीसांच्या कानावर घातले होते. आता त्यावर काय निर्णय होतो ते बघाव लागलं, असे रोहित पवार म्हणाले.
महाविकास आघाडीने अनेक प्रोजेक्ट मंजूर केले होते. शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर त्या कामांना स्थगिती दिली आहे. स्थगित कामे अजून स्थगित आहेत. नवीन कामांना मंजूरी मिळाली नाही, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला.
आपल्याकडे सातत्याने निवडणुका होत असल्याने आचारसंहिता लागू होत असते. मग काम करायची कधी? यामुळे सामान्य लोकांना अडचण होते, असे आमदार रोहित पवार म्हणाले.