सोमेश्वरच्या निवडणुकीत पवार कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला; शरद पवारांच्या बिनविरोध प्रयत्नांना यश येणार?

Someshwar Factory Election : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत पवार कुटुंबातील दोन गट आमनेसामने येण्याची शक्यता, शरद पवार यांचा बिनविरोधचा प्रयत्न.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 09 25T163805.226

बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर (Someshwar Factory) सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक यंदा विशेष चर्चेत आली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर सहकार क्षेत्रात होणारी ही पहिली मोठी निवडणूक असल्याने बारामतीतील पवार कुटुंबातील राजकीय समीकरणांकडे लक्ष लागलं आहे. शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांनी तयारी सुरू केली असून, दुसरीकडे सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालीही हालचाली सुरू आहेत. त्यामुळे सुरुवातीपासूनच निवडणुकीत पवार कुटुंबातील दोन गट आमनेसामने येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शरद पवार यांच्या भूमिकेकडेही लक्ष लागलं आहे. युगेंद्र पवार यांच्या माध्यमातून शरद पवार गटाने कारखान्याच्या निवडणुकीत तयारी सुरू केली असली, तरी बिनविरोध निवडणुकीबाबत हालचाली होणार का, याची चर्चा आहे. मात्र, सध्या दोन्ही राष्ट्रवादी गटांकडून स्वतंत्र पॅनेल उभं करण्याची तयारी असल्याचं वृत्त आहे. भाजप आणि शिवसेनेकडूनही स्वतंत्र पॅनेल उभारण्याच्या हालचाली सुरू असल्याने निवडणुकीचं राजकीय गणित अधिक गुंतागुंतीचं झालं आहे.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शिंदेंच्या शिवतारेंची उडी! 21 जागांसाठी 42 अर्ज दाखल…

सोमेश्वर कारखान्याच्या 21 संचालकपदांसाठी तब्बल 601 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे इच्छुकांची संख्या मोठी असून पॅनेल निश्चित करताना सर्वच गटांसमोर आव्हान निर्माण झालं आहे. अर्जांची छाननी झाल्यानंतर आता 30 सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर 2 ऑक्टोबरला अंतिम उमेदवार यादी आणि निवडणूक चिन्हांचं वाटप होणार असून 11 ऑक्टोबरला मतदान, तर 12 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

युगेंद्र पवारांनी यापूर्वीच शेतकरी पॅनेलच्या माध्यमातून निवडणुकीत उतरण्याचे संकेत दिले आहेत. दुसरीकडे सुनेत्रा पवार गटाकडूनही इच्छुकांच्या मुलाखती आणि उमेदवार निश्चितीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे सोमेश्वरची निवडणूक केवळ सहकारी कारखान्यापुरती मर्यादित न राहता बारामतीच्या स्थानिक राजकारणातील पवार कुटुंबातील बदललेल्या समीकरणांचीही कसोटी मानली जात आहे. आता 30 सप्टेंबरपर्यंत बिनविरोध निवडणुकीसाठी काही तडजोड होते की प्रत्यक्ष पॅनेल विरुद्ध पॅनेल सामना रंगतो, याकडे सभासदांसह राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

follow us