कोल्हापूर : उत्तरेवर भाजपचा दावा, राजेश क्षीरसागरांची दक्षिणेत चाचपणी; दोन्ही घरचा पाहुणा उपाशी राहणार?

कोल्हापूर : उत्तरेवर भाजपचा दावा, राजेश क्षीरसागरांची दक्षिणेत चाचपणी; दोन्ही घरचा पाहुणा उपाशी राहणार?

कोल्हापूर : विधानसभेला अद्याप एक वर्षाचा कालावधी शिल्लक आहे, लोकसभेला कशी गणित मांडली जाणार याचे चित्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही. पण त्यापूर्वीच अनेक इच्छुकांनी आपली मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यात नाव घ्यावे लागते ते राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांचे. एकदा पराभव आणि एकदा माघार यामुळे आता कोणत्याही परिस्थिती विधानसभा मारायची यासाठी त्यांनी आतापासूनच पावलं उचलायला सुरुवात केली आहे. याच तयारीचा एक भाग म्हणून त्यांनी आता त्यांचा पारंपारिक कोल्हापूर उत्तर मतदारसंघ सोडून कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढविता येईल का याची चाचपणी सुरु केली आहे. (Rajesh Kshirsagar has started testing contest the election from the Kolhapur South constituency)

2019 मध्ये क्षीरसागर यांचा उत्तर मतदारसंघातून पराभव झाला. तर त्यानंतरच्या पोटनिवडणुकीत त्यांना माघार घ्यावी लागली आणि काँग्रेसला पाठिंबा द्यावा लागला. त्या पोटनिवडणुकीत भाजपनेही चांगली मते मिळविली होती. त्यामुळे आता कोल्हापूर उत्तरमधून भाजपने दावा ठोकला असून आगामी आमदार भाजपचाच असणार असा प्रचार सुरु केला आहे. यावर ऐनवेळी धावपळ नको म्हणून क्षीरसागर यांनी दक्षिणेत आतापासूनच संपर्क वाढविण्यास सुरुवात केली आहे. पण इथून माजी आमदार अमल महाडिक हेच उमेदवार असा विश्वास राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये तिकीटासाठीही चुरस रंगताना दिसणार आहे.

“दक्षिण ना उत्तर, विकासाचं पर्व दक्षिणोत्तर”

कोल्हापूरचे राजकारण हे पक्षापेक्षा नेत्यांभोवती आणि गटातटाभोवती फिरत असते. 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये याचा प्रत्यय आला होता. 2019 च्या विधानसभेवेळी राजेश क्षीरसागर हे उत्तरेतून उभे होते. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत विरोधातील उमेदवार कोण असणार याची कल्पना नव्हती. मात्र ऐनवेळी काँग्रेसने भाजपचे नगरसेवक असलेल्या चंद्रकांत पंडीत जाधव यांना उमेदवारी दिली. काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी जाधव यांना निवडून आणण्यासाठी परफेक्ट फिल्डिंग लावली. जाधव यांनी आपले नेटवर्क वापरत विजय सोपा केला.

नवख्या उमेदवाराकडून झालेला पराभव हा क्षीरसागर यांच्यासाठी मोठा धक्का होता. मात्र त्यांच्या पराभवामागे भाजपचे तत्कालिन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील असल्याचा आरोप करण्यात आला. दबक्या आवाजात आजही कोल्हापूरमध्ये या चर्चा होत असतात. चंद्रकांत पाटील यांनीच जाधव यांना अंतर्गत मदत केली आणि निवडूनही आणले, असे बोलले गेले. त्यानंतर अवघ्या दोन वर्षातच आमदार जाधव यांचे निधन झाले. त्यानंतरच्या पोटनिवडणुकीत क्षीरसागर यांनी शिवसेनेने या मतदारसंघात पुन्हा निवडणूक लढवावी यासाठी पक्षश्रेष्ठींनी आग्रह धरला. मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदारसंघ काँग्रेसलाच सोडण्याचा निर्णय घेतला.

त्यावेळी क्षीरसागर यांनी दोन दिवसांचे अल्पकालीन बंडही केले. मात्र युतीधर्माचे पालन करत क्षीरसागर यांनी माघार घेतली आणि महायुतीचे उमेदवार म्हणून काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना पाठिंबा दिला. त्यावेळी भाजपने सत्यजित कदम यांना मैदानात उतरविले. कदम यांनी तगडी लढत दिली. तीन पक्ष एकत्रित असूनही जाधव यांचा केवळ 20 हजारांच्या मताधिक्याने विजय झाला. कदम यांना तब्बल 77 हजार मते मिळाली तर जाधव यांना 97 हजार मते मिळाली. पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर क्षीरसागर यांनीही शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला.

त्याचवेळी आता भाजपने उत्तर मतदारसंघावर दावा सांगायला सुरुवात केली आहे. आपली ताकद असल्याचं म्हणत आगामी निवडणुकीत भाजपचाच आमदार असणार असे सांगितले जात आहे. त्यामुळे क्षीरसागर यांनी आता दक्षिणेतून चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. “दक्षिण ना उत्तर, विकासाचं पर्व दक्षिणोत्तर” असं म्हणत त्यांनी दोन्ही मतदारसंघात कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. तसंच माझी लोकप्रियता जिल्हाभर असून कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची माझी तयारी आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.

दक्षिणेत जागा मिळविणे क्षीरसागरांसाठी अवघड :

कोल्हापूर दक्षिणमधून अमल महाडिक यांनी 2014 साली सतेज पाटील यांचा पराभव करत विधानसभा गाठली. याचे उट्टे काढत सतेज पाटील यांनी 2019 च्या निवडणुकीत पुतण्या ऋतुराज पाटील याला निवडणुकीत उतरवत हा मतदारसंघ पुन्हा काबिज केला. आता पुन्हा या मतदारसंघासाठी दोघांत रस्सीखेच सुरू असतानाच क्षीरसागर यांनी चाचपणी सुरु केली. त्याचवेळी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून भाजपकडून अमल महाडिकच निवडणूक लढवतील आणि ते निवडून सुद्धा येतील असा विश्वास धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे महाडिक विरुद्ध पाटील अशी लढत होऊन क्षीरसागर यांचा पत्ता कट होणार की, महाडिक यांना थांबवून क्षीरसागर यांना संधी मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube