Sharad Pawar : ‘चंद्रकांत पाटलांना नक्की कळेल पण, निवडणुकीनंतर’; शरद पवारांनी नेमकं काय सांगितलं?
Sharad Pawar : दिवाळी सणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार एकत्र आले होते. त्यांच्या या भेटीची चर्चा अजूनही राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यांच्या या भेटीवर भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी खोचक टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता शरद पवार यांनी पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवार आज माढा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी कापसेवाडी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राज्यात होणाऱ्या आगामी निवडणुकांवर भाष्य केले. दोन पवारांच्या भेटीवर चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले होते. दोन पवार भेटले की समजेल काय घडलं ते, असे पाटील म्हणाले होते. यावर आता शरद पवार यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला. चंद्रकांत पाटलांना नक्की कळेल काय घडलं ते पण, निवडणुकीच्या निकालानंतर कळेल, असे शरद पवार म्हणाले.
Sharad Pawar : पवारांचा मोठा गौप्यस्फोट; ‘इंडिया’ आघाडीत सर्वकाही आलबेल नाही
मध्य प्रदेश निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यात पुन्हा सत्ता आल्यास राम मंदिराचे मोफत दर्शन घडवू असे म्हणाले होते. यावर पवार म्हणाले, राम मंदिरात मोफत प्रवेश देऊ, असं देशाचे गृहमंत्री प्रचार करतात. मंदिरात जायला पैसे लागतात का? राज्यकर्त्यांची पातळी अशा स्तरावर गेली आहे की त्याची चर्चा न केलेली बरी.
जागावाटपासाठी दिवाळीनंतर बैठक
लोकसभा निवडणूक जवळ आली असून जागवाटपाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. राजकीय पक्षांकडून चाचपणी केली जात आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना व मित्र पक्ष मिळून चर्चा करू. मला खात्री आहे की आम्ही एकत्रितपणे लोकांसमोर नवा पर्याय देऊ. दिवाळी झाल्यानंतर याबाबत बैठक घेऊ असे शरद पवार म्हणाले.
मोदींना निवडणुकीत किंमत मोजावी लागेल
यानंतर शरद पवार यांन पीएम मोदींनाही फैलावर घेतले. मोदी सध्या ज्या पद्धतीने गोष्टी मांडत आहेत. त्या प्रकारचे राजकारण आम्ही कधीच पाहिले नाही. मी नेहरू, इंदिरा गांधी, शास्त्रीजी यांची भाषणं ऐकली. त्यावेळी पंतप्रधान कोणत्याही राज्यात गेले तरी तिथल्या मुख्यमंत्र्यांबद्दल अपमानास्पद बोलले नाहीत. पण, मोदी हे असे पहिलेच पंतप्रधान आहेत जे दुसऱ्या राज्यात गेल्यानंतर भाजप सोडून अन्य पक्षाच्या मुख्यमंत्र्यांवर व्यक्तिगत हल्ला करतात. आता चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत मोदींना याची किंमत चुकवावी लागेल, असेही शरद पवार म्हणाले.