Balasaheb Thorat च्या राजीनाम्यावर सुधीर तांबेंची पहिली प्रतिक्रिया…
अहमदनगर : काँग्रेस (Congress) नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या विधिमंडळ पक्षनेते (Legislative Party Leaders) पदाच्या राजीनाम्यावर माजी आमदार सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. थोरातांचा हा निर्णय व्यथित करणारा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात सुधीर तांबे म्हणाले, बाळासाहेब थोरात यांना काही गोष्टींमध्ये विश्वासात घेतलं नाही.
पक्षनिष्ठ राहून त्यांनी सदैव काम केलं, त्यामुळे त्यांच्या आताच्या नाराजीचा विचार व्हावा आणि पक्षश्रेष्ठींनी याप्रकरणी योग्य तो निर्णय घ्यावा, अशी प्रतिक्रिया तांबे यांनी दिली आहे.
सुधीर तांबे यांनी बोलताना सांगितलं की, “बाळासाहेब थोरातांनी राजीनामा देणं, हे खूप व्यथित करणारं आहे. बाळासाहेब थोरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाच्या विचारांशी ते एकनिष्ठ आहे, अशा व्यक्तीवर विधीमंडळ पदाचा राजीनामा देण्याची का वेळ यावी? याची गंभीर दखल घेणं गरजेचं आहे.”
पुढं बोलताना सुधीर तांबे म्हणाले, “जेव्हा एखादी व्यक्ती त्या पक्षाच्या विचारधारेशी जोडलेली असते. त्यासाठी इतक्या समर्पित भावनेनं काम करते. अशा व्यक्तींना विश्वासात न घेणं हे फार दुर्दैवी आहे. गेल्या काही दिवसांत ज्या घडामोडी घडल्यात, त्या काळात त्यांच्याशी चर्चा होणं, गरजेचं होतं. पण ते झालं नाही.”
पुढे बोलताना ते म्हणाले की, “काँग्रेसच्या अडचणीच्या काळात नेतृत्त्व दिलं. पक्षाच्या सर्वच कामांमध्ये, कार्यक्रमांमध्ये स्वतःला झोकून दिलं, अशा व्यक्तीवर असा निर्णय घेण्याची वेळ का आली? याची पक्षश्रेष्ठींनी गंभीर दखल घेण्याची गरज आहे.”
दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांचा विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्यानं मिळत आहे. यावरुन काँग्रेसमधील अंतर्गत कलह विकोपाला पोहोचला आहे.