Satyajit Tambe : थोरातांच्या भितीने सत्यजित तांबेंच्या मित्रांची कोंडी
अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदार संघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांचे काँग्रेस (Congress) पक्षातून निलंबन करण्यात आले आहे. त्यांच्या निलंबनानंतर अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची कोंडी झालीय.
आपण जर सत्यजित तांबेंना जाहीर पाठिंबा दिला बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आपल्यावर कारवाई करू शकतात. सत्यजित तांबेंच्या मित्रांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधला होता. सत्यजित तांबेंच्या बाजूने असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र नंतर त्यांच्या लक्षात आले की थोरात आपली कोंडी करु शकतात. त्यामुळे त्यांनी आपले नाव न वापरण्याचे सांगितले.
लेट्सअप मराठीशी बोलताना ते म्हणाले, काँग्रेसने सत्यजित तांबेंच निलंबन कोणत्या कारणाने केले हेच आमच्या अजून लक्षात येत नाही. युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना सत्यजित तांबेंनी चांगले काम केले आहे. त्यांच्या वडिलांचे देखील पक्षासाठी मोठं योगदान आहे. त्यामुळे त्यांचे निलंबन चुकीचे आहे.
काँग्रेस पक्षासोबत आहात की तांबेंसोबत? या प्रश्नांवर बोलताना ते म्हणाले, काँग्रेस पक्षाने जरी निलंबन केले असले तरी देखील सत्यजित तांबे काँग्रेस पक्षाचे आहेत. ते अजूनही काँग्रेस पक्षाचे असल्याचे सांगतात. अपक्ष उमेदवार असल्यावर कोणी कोणाकडे देखील पाठिंबा मागू शकतो.
सत्यजित तांबेंना कोरा AB फॉर्म दिल्याचं बोललं जातं. असं असताना देखील त्यांनी अपक्ष उमेदवारी का केली? या प्रश्नांवर ते म्हणाले, पक्षाने त्यांना कोरा AB फॉर्म दिला नव्हता. अशाप्रकारच्या बातम्या चुकीच्या आहेत. AB फॉर्म दिला नाही म्हणून त्यांना अपक्ष फॉर्म भरावा लागला.
सत्यजित तांबे गेल्या वीस वर्षापासून काँग्रेस पक्षाचे काम करीत आहेत. त्यांच्यामुळे आम्ही काँग्रेससोबत जोडलो आहोत. त्यामुळे आम्ही सत्यजितदादांसोबत आहोत, असे ते म्हणाले.