हरेगाव मारहाण प्रकरणातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करा, प्रकाश आंबेडकरांची मागणी
अहमदनगर : कबूतर चोरीचा कोणताही गुन्हा दाखल नसताना हरेगाव येथील चार जणांना मारहाण झाल्याची घटना जिल्ह्यात घडली. त्या तरुणांबाबत घडलेली घटना अत्यंत चुकीची असून या घटनेतील आरोपींविरोधात मोक्का (MCOCA) अथवा एमपीडीए अंतर्गत कारवाई व्हावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर (Adv. Prakash Ambedkar) यांनी केली. (Ahmednagar News)
श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर आंबेडकर यांनी आज जखमी पीडित मुलांची भेट घेतली. त्यानंतर हरेगाव येथे जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यानंतर येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली.
यावेळी बोलताना ॲड. आंबेडकर म्हणाले, जखमींवर व्यवस्थित उपचार सुरू असले तरी त्यांना मानसोपचार तज्ञाकडून उपचाराची गरज आहे. धर्म जात बघण्यापेक्षा माणूस म्हणून माणसावर केलेल्या अत्याचाराचा समाजाच्या प्रत्येक घटकातून संताप व्यक्त होत गेला, ही सकारात्मक बाब असून काही राजकीय मंडळी मात्र याला अपवाद आहेत. गेल्या तीन ते चार महिन्यात आरोपींच्या संपर्कात कोण कोण आले, याची यादी पोलिसांनी तयार करावी. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नेमकं प्रकरण तरी काय?
अहमदनगर जिल्ह्यातील हरेगाव गावात शेळी आणि काही कबुतर चोरल्याच्या संशयावरून चार दलित तरुणांना झाडाला उलटे टांगून मारहाण करण्यात आली होती. युवराज नानासाहेब गलांडे यांच्या घरातून शेळ्या व कबुतरे चोरीला गेली होती. ती या चार तरुणांनी ही चोरी केल्याचा संशय गलांडे यांना होता. त्यामुळे त्यांना घरातून उचलून अज्ञात ठिकाणी नेऊन झाडाला उलटे टांगून त्याचे कपडे काढून बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. युवराज गलांडे, मनोज बोडके, पप्पू पारखे, दीपक गायकवाड, दुर्गेश वैद्य, राजू बोरगे अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून शुभम माघाडे, कुणाल मगर, ओम गायकवाड आणि प्रणय खंडागळे यांना जबर मारहाण करण्यात आली. यातील दोघे अल्पवयीन असून ते दलित समाजातील आहेत.
आरोपींनी पीडित मुलांसोबत लज्जास्पद कृत्य केले. दरम्यान, या घटनेच्या विरोधात आंबेडकरी समाजाच्या वतीने श्रीरामपूर नेवासे राज्य मार्गावर आंदोलन करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून आंदोलकांच्या विरोधानंतर गलांडे नावाच्या मुख्य सूत्रधारावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.