पंढरपुरात गोडसेच्या समर्थनार्थ घोषणाबाजी; ‘उदात्तीकरण खपवून घेणार नाही’; वडेट्टीवारांचा इशारा
Pandharpur News : महात्मा गांधी यांचा (Mahatma Gandhi) मारेकरी नथुराम गोडसेच्या समर्थनार्थ पंढरपुरात (Pandharpur) काही जणांनी घोषणाबाजी केल्याचा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत त्यांनी संताप व्यक्त केला. नथुराम गोडसेच्या (Nathuram Godse) समर्थनार्थ घोषणा दिल्या जात असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. नथुराम गोडसेचे उदात्तीकरण कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही, अशा कठोर शब्दांत त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला. तसेच घोषणा देणाऱ्या या समाजकंटकांवर सरकारने कारवाई करावी, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली.
पेपरफुटीविरोधातील आंदोलन दडपण्याचा सरकारचा डाव, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आक्रमक
या घटनेचा एक व्हिडिओ वडेट्टीवार यांनी त्यांच्या ‘एक्स’ सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या केलेल्या नथुराम गोडसेच्या समर्थनार्थ पंढरपुरात काही समाजकंटकांनी जयजयकाराच्या घोषणा देत पोस्टरबाजी केल्याचे समोर आले आहे. या समाजकंटकांवर सरकारने कठोर कारवाई करावी. महाराष्ट्राच्या मातीत नथुरान गोडसेचे उदात्तीकरण खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा त्यांनी या पोस्टमध्ये सरकारला दिला आहे.
सरकारने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घोषणाबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. स्वातंत्र्याचे स्वैराचारात रुपांतर करून अशा पद्धतीने धुडगूस घालणाऱ्या प्रवृत्तींचा बंदोबस्त सरकारने करावा. या माथेफिरूंना कायमची अद्दल घडेल अशी कारवाई आता सरकारने केली पाहिजे म्हणजे भविष्यात असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत, असे विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले.
ललित पाटीलवर सरकारचाच आशिर्वाद; विजय वडेट्टीवार यांचे पुणे, नाशिक पोलिसांवर गंभीर आरोप
दरम्यान, देशभरात आज सर्वत्र प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आजच वडेट्टीवार यांनी हा व्हिडिओ शेअर करत या गंभीर प्रकाराकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे. या व्हिडिओत नथुराम गोडसेच्या समर्थनार्थ घोषणा देणााऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. यानंतर आता राज्य सरकार हे प्रकरण गांभीर्याने घेते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.