तीन बडे नेते, 45 मिनिटांची बैठक आणि अनेक राजकीय मुद्दे! अमित शाहांच्या पुणे दौऱ्यात नेमकं काय घडलं?

अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या तीन प्रमुख नेत्यांमध्ये सुमारे 40 ते 45 मिनिटं महत्त्वाची बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 11 16T133220.260

What exactly happened during Amit Shah’s visit to Pune? : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असून, त्यांच्या दौऱ्यामुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. सेनापती बापट रोडवरील जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये अमित शाह यांचा मुक्काम आहे. विशेष म्हणजे, याच हॉटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही मुक्कामी होते. आज सकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्याहून पुण्यात दाखल झाले. त्यानंतर अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या तीन प्रमुख नेत्यांमध्ये सुमारे 40 ते 45 मिनिटं महत्त्वाची बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे.

या बैठकीत राज्यातील सद्यस्थिती, आगामी राजकीय घडामोडी आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेबाबत अमित शाह यांनी शिंदे आणि फडणवीस यांच्याकडून माहिती घेतल्याचं सांगितलं जात आहे. राज्यातील सत्ताधारी पक्षांमधील समन्वय, आगामी राजकीय आव्हानं आणि राज्यातील बदलती राजकीय समीकरणं यावरही चर्चा झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे. विशेष म्हणजे, दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर या तिन्ही नेत्यांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.

राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न हाही या बैठकीतील महत्त्वाचा मुद्दा असल्याची माहिती आहे. शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य सरकारकडून कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत, याचा आढावा अमित शाह यांनी घेतल्याचं समजतंय. तसेच शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून आणखी मोठ्या आर्थिक मदतीची अपेक्षा असून, त्याबाबत अमित शाह यांच्याकडे मागणी करण्यात आल्याची माहिती आहे. याशिवाय महाराष्ट्रात आणखी मोठे विकासप्रकल्प आणण्यासंदर्भातही चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या बैठकीत केवळ राजकीय विषयच नाही, तर राज्याच्या विकासाशी संबंधित मुद्द्यांवरही चर्चा झाल्याचं समोर येत आहे.

भारतीय वैद्यकीय क्षेत्रात रचला इतिहास! AIIMS दिल्लीकडून आईच्या गर्भातच बाळाच्या मणक्याची यशस्वी शस्त्रक्रिया

बैठक संपल्यानंतर अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे तिन्ही नेते हॉटेलमधून बाहेर आले. त्यानंतर अमित शाह यांच्या वाहनातून मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे भारतीय जैन संघटनेच्या कार्यक्रमस्थळाकडे रवाना झाले. सकाळपासूनच या हॉटेल परिसरात राजकीय हालचालींना वेग आला होता. अमित शाह यांच्या भेटीसाठी भाजप आणि शिवसेनेचे अनेक नेते हॉटेलमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे या भेटीगाठींकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

दरम्यान, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही अमित शाह यांची भेट घेतली. त्यांच्याशिवाय खासदार ओमराजे निंबाळकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर हेही अमित शाह यांच्या भेटीसाठी जेडब्ल्यू मॅरियटमध्ये पोहोचले होते. भाजपचे अनेक पदाधिकारी आणि नेत्यांनीही यावेळी उपस्थिती लावली. त्यामुळे अमित शाहांच्या पुणे दौऱ्याला राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

पुण्यातील एअर होस्टेस वर्षा तुरकरची संशयास्पद हत्या, गोदियामधील जंगलात रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

भारतीय जैन संघटनेचा कार्यक्रम पार पडल्यानंतर पुणे जिल्हा परिषदेत लोकनेते अजितदादा पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण आणि प्रवेशद्वाराच्या नामकरणाचा सोहळा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी खासदार पार्थ पवार आणि जय पवारही उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे अजितदादांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

एकूणच अमित शाहांच्या पुणे दौऱ्यातील शिंदे-फडणवीसांसोबतची बैठक, दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची चर्चा आणि अजितदादा पवार यांच्या पुतळ्याचं अनावरण या तिन्ही घडामोडींमुळे पुण्यातील राजकीय वातावरण चांगलंच चर्चेत आलं आहे. या बैठकीत नेमकी कोणती राजकीय रणनीती ठरली आणि त्याचे आगामी काळात काय परिणाम दिसणार, याकडे आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

follow us

संबंधित बातम्या