फडणवीस-देशमुख वादात नवीन नावाची एन्ट्री : चर्चेत आलेले ‘समित कदम’ कोण आहेत?

फडणवीस-देशमुख वादात नवीन नावाची एन्ट्री : चर्चेत आलेले ‘समित कदम’ कोण आहेत?

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यातील जुन्या वादाने आता नवीन वळण घेतले आहे. ईडी कारवाईपासून वाचण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मला ऑफर दिली होती. तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांना गुन्ह्यांमध्ये अडकवण्यासाठी प्रतिज्ञापत्रांवर सही करण्यासाठी त्यांनी माझ्यावर दबाव टाकला होता, असा आरोप देशमुख यांनी फडणवीस यांच्यावर केला होता. दरम्यान, फडणवीस यांची ही ऑफर घेऊन येणारा व्यक्ती कोण होता, याचा खुलासाही देशमुख यांनी केला आहे. (Who exactly is Samit Kadam who is in the discussion of Devendra Fadnavis and Anil Deshmukh?)

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये फडणवीस यांची ऑफर घेऊन येणारा व्यक्ती समित कदम होते, असे देशमुख यांनी सांगितले.  फडणवीस यांनी समित कदम यांना माझ्याकडे पाठविले होते, असा आरोप देशमुख यांनी केला आहे. समित कदम हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत, तेच माझ्याकडे आले होते, फडणवीसांना तुमच्याशी बोलायचे आहे, असे म्हणत त्यांनी फडणीस यांना फोन लावला होता. त्यांनी पाकिटात प्रतिज्ञापत्र आणले होते, त्या भेटीचे फुटेजही आपल्याकडे असल्याचा दावा करत देशमुख यांनी आपण आपल्या आरोपांवर ठाम असल्याचे म्हंटले आहे.

देशमुख यांच्या या दाव्यानंतर त्यांच्या आणि फडणवीस यांच्या वादात समित कदम या नव्या नावाची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे हे समित कदम नेमके आहेत, तरी कोण असा सवाल विचारला जाऊ लागला आहे. 

कोण आहेत समित कदम?

समित कदम हे मुळचे सांगली जिल्ह्यातील मिरजचे आहेत. 2008 पासून ते राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. जनसुराज्य युवा शक्तिमध्ये काम करण्यापासून त्यांची सुरुवात झाली होती. आता ते पन्हाळा-शाहुवाडी मतदारसंघाचे आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. जनसुराज्य हा कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामध्ये कार्यरत असणारा एक स्थानिक पक्ष आहे. महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत एक दबाव गट बाळगून असलेला पक्ष म्हणून जनसुराज्यची ओळख आहे.

आमदार विनय कोरे हेही सध्या महायुतीसोबतच आहेत. यांच्यासोबत समित कदम हेही काम करतात. कदम यांनी संघटनेत काम केले असले तरी आतापर्यंत त्यांनी एकही निवडणूक लढलेली नाही. पण, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ते इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसापूर्वी मिरजमध्ये तसे बॅनर्सही लागले होते. मिरजमध्ये ते वेगवेगळे कार्यक्रमाचे आयोजन करत असतात. गेल्या वर्षी त्यांनी दहीहंडीचाही मोठा कार्यक्रम आयोजित केला होता.

देशमुख यांच्या आरोपांवर समित कदम काय म्हणाले?

तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बोलाविल्यामुळेच मी त्यांच्या निवासस्थानी गेलो होतो. स्वतःहून गेलो नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मला माझ्या काही अडचणींमध्ये मदत करावी, अशी इच्छा अनिल देशमुख यांनी माझ्याकडे व्यक्त केली. त्यांनी तशी विनंती फडणवीस यांना करावी आणि तसा निरोप पोहचवावा अशी विनंतीही केली होती. फडणवीस यांनी कोणतेही प्रतिज्ञापत्र दिलेले नव्हते. देशमुख यांना भेटा, असे फडणवीस यांनी मला कधीच सांगितले नव्हते, असे स्पष्टीकरण समित कदम यांनी दिले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube