अंधेरीच्या हॉस्पिटलची जागा ‘अदानी’च्या घशात घालण्याचा डाव, राजेश शर्मांचा गंभीर आरोप

अंधेरीच्या हॉस्पिटलची जागा ‘अदानी’च्या घशात घालण्याचा डाव, राजेश शर्मांचा गंभीर आरोप

मुंबई : अंधेरीच्या कामगार हॉस्पिटलची पाच हजार कोटी रुपये किमतीची जवळपास १२ एकर जमीन अदानी या उद्योगपतीच्या घशात घालण्याचे षडयंत्र असल्यानेच हे हॉस्पिटल सुरु केले जात नाही, असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राजेश शर्मा यांनी केला आहे. गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले, अंधेरीमध्ये १९७७ साली या कामगार हॉस्पिटलची स्थापना करण्यात आली असून २००८ सालापर्यंत राज्य सरकारच्या अधिपत्याखाली हॉस्पिटलचे काम सुरु होते. त्यानंतर हे हॉस्पिटल ESI कार्पोरेशनने १४ एप्रिल २००८ रोजी त्यांच्याकडे वर्ग करुन घेतले.

कर्मचारी राज्य विमा महामंडळाने या हॉस्पिटलचे आधुनिकीकरण करुन ५०० बेडसचे हॉस्पिटल केले व मेडिकल कॉलेजही सुरु केले. या रुग्णालयात १७ डिसेंबर २०१८ रोजी आगीची दुर्घटना घडली व त्यामध्ये १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर १५० जण जखमी झाले.

ही दुर्घटना घडण्याआधी रुग्णालयात सर्व सुविधा २४ तास सुरु होत्या. रुग्णांची देखील मोठ्या प्रमाणात येणं सुरु होतं. महाराष्ट्रातील अनेक शहरातून कामगार अंधेरीच्या हॉस्पिटमध्ये उपचारासाठी येत होते. मोठ-मोठ्या शस्त्रक्रियाही मोफत केल्या जात असल्याचं त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.

यासर्व सुविधांयुक्त हॉस्पिटल चार वर्षांपासून बंद असल्याने कामगारांना हालअपेष्टा सहन करत कांदिवलीच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जावे लागते. हॉस्पिटल सुरु होत नसल्याने कामगारांमध्ये प्रचंड असंतोष आहे. हॉस्पिटल बंद करून लाखो कामगारांच्या आरोग्याशी खेळून ही जागा उद्योगपतीच्या घशात घातली जात आहे.

दरम्यान, केंद्र सरकारसह महाराष्ट्र सरकारनेही लक्ष घालून वस्तुस्थिती स्पष्ट करुन ह़ॉस्पिटल पुन्हा सुरु करावे, अशी काँग्रेस पक्षाची मागणी आहे. सरकारने यावर तातडीने निर्णय करावा अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा राजेश शर्मा यांनी दिलाय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube