कलावंतांसाठी बातमी! यंदा होणार ‘नाट्य परिषद करंडक’, एकांकिका सादरीकरणाची नामी संधी

कलावंतांसाठी बातमी! यंदा होणार ‘नाट्य परिषद करंडक’, एकांकिका सादरीकरणाची नामी संधी

Mumbai News : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आयोजित शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनानिमित्त सुरू झालेला ‘नाट्यकलेचा जागर’ दरवर्षी महाराष्ट्रभर विविध (Mumbai News) कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. यंदा ‘नाट्य परिषद करंडक’ आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिली. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील कलावंत, नाट्यकर्मींसाठी हा स्पर्धात्मक महोत्सव राज्यस्तरावर आयोजित केला असून या स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील सर्व कलावंतांनी भाग घ्यावा असे आवाहन उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी केले आहे.

मागील वर्षी ‘नाट्यकलेचा जागर’ हा स्पर्धात्मक महोत्सव महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर यशस्वीरित्या सादर झाला. यात एकांकिका स्पर्धा, बालनाट्य स्पर्धा, एकपात्री स्पर्धा, नाट्यवाचन स्पर्धा, नाट्यछटा स्पर्धा, नाट्यसंगीत पद गायन स्पर्धा यांचा समावेश होता. यावर्षी पासून’नाट्य परिषद करंडक’ ह्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे नाट्य परिषदेच्या नियामक मंडळ व कार्यकारी समितीने ठरविले आहे.

ही स्पर्धा प्राथमिक व अंतिम फेरी अशा दोन फेऱ्यांमध्ये होणार आहे. शनिवार 23 व रविवार 24 ऑगस्ट 2025 पासून विविध केंद्रांवर प्राथमिक फेरी सुरू होऊन यातील निवडक 25 कलाकृतींची अंतिम फेरी दिनांक 15, 16, 17 व 18 सप्टेंबर 2025 रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, मनमाला टॅक रोड, माटुंगा – माहीम, मुंबई येथे होणार आहे. अंतिम फेरीत निवड झालेल्या कलावंतांसाठी नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. हे शिबिर नाट्यक्षेत्रातील दिग्गज दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री घेणार असून अंतिम फेरीतील सादरीकरणाचा दर्जा यामुळे सर्वोत्तम असणार आहे.

Romance Ki Barsaat मध्ये मोठा ट्विस्ट, अनुपमा-अनुज दिसणार एकत्र?

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी एकांकिका स्पर्धा घेण्याचा नाट्य परिषदेचा मानस आहे. ज्या जिल्ह्यातून किमान 10 प्रवेशिका येतील त्याठिकाणी स्पर्धेचे केंद्र देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सर्व गुणवंत कलाकारांना नाट्यसंमेलनात आपली कला सादर करण्याची संधी यामधून मिळणार आहे.

स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी रोख पारितोषिके पुढीलप्रमाणे

एकांकिका स्पर्धा सर्वोत्कृष्ट प्रथम रु.1,00,000/-, उत्कृष्ट द्वितीय रु.75,000/-, उत्तम तृतीय रु.50,000/-, दोन उत्तेजनार्थ पारितोषिके रु.15,000/-

तसेच लेखन/दिग्दर्शन/नेपथ्य/प्रकाश योजना/पार्श्वसंगीत/रंगभूषा व वेशभूषा/स्त्री अभिनय/पुरूष अभिनय वैयक्तिक रोख पारितोषिके (एकांकिका स्पर्धेसाठी) रु.7,000/-, रु.5,000/- , रु.3000/- देण्यात येणार आहेत.

तसेच या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीस सहभागी संस्थांना सादरीकरण मानधन रु.2000/- रूपये देण्यात येणार आहेत. सर्व सहभागी कलावंत, तंत्रज्ञ यांना सहभागपत्र देण्यात येणार आहे. एकांकिकेसाठी प्रवेश फी रु.1000/- ठेवण्यात आली आहे.

या सर्व स्पर्धांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच होणार असून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून एकांकिका स्पर्धेची माहिती, नियमावली www.natyaparishad.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. स्पर्धेचे प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची तारीख आणि वेळ दिनांक 10 ऑगस्ट 2025 सायंकाळी 7 वाजेपर्यंत आहे. त्यानंतर आलेल्या प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत.

Romance Ki Barsaat मध्ये मोठा ट्विस्ट, अनुपमा-अनुज दिसणार एकत्र?

स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी 8591706887 या क्रमांकावर संपर्क साधावा. या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, कलावंतांनी, महाविद्यालय, हौशी संस्था, विद्यापीठाच्या व इतर महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आव्हान नाट्य परिषदेच्यावतीने करण्यात आले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube