“घरात घुसला तेव्हा तो खूप आक्रमक होता सैफने त्याला..”, करिनाने पोलिसांना काय सांगितलं?
Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवरील चाकू हल्ल्याच्या घटनेला दोन दिवस (Saif Ali Khan) उलटून गेले आहेत. या दोन दिवसांत बऱ्याच घडामोडी घडल्या. सैफवर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता त्याची प्रकृती स्थिर आहे. दुसरीकडे पोलिसांनी कारवाई करत एका संशयिताला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी सैफची पत्नी करिना कपूर खान हिचाही जबाब नोंदवला आहे. तिने आपल्या जबाबात हल्ल्यावेळी घरात नेमकं काय घडलं? हल्लेखोराचं वर्तन कसं होतं? याची माहिती जबाबात दिली आहे.
एबीपी माझाच्या रिपोर्टनुसार, हल्लेखोर घरात घुसला तेव्हा तो खूप आक्रमक होता. खान कुटुंबीय कसेबसे बाराव्या मजल्यावर गेले. समोरच दागिने पडले होते पण हल्लेखोर तिथे पोहोचू शकला नाही. त्याने कोणत्याही वस्तुंची चोरी केली नाही. ज्यावेळी सैफ आणि त्याच्यात झटापट सुरू होती त्यावेळी तो आरोपी खूप आक्रमक झाला होता.
हल्लेखोराच्या टार्गेटवर सैफ नाही तर..शरद पवार गटातील आमदाराचा धक्कादायक दावा
घरातील मुले आणि महिलांना वाचविण्यासाठी सैफने हल्लेखोराला रोखण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटत होतं की तो हल्लेखोर आमचा लहान मुलगा जहांगीरवर हल्ला करायला निघाला आहे. कारण त्यावेळी हल्लेखोर जहांगीरच्याच खोलीत होता. घरातील महिलांनी आणि सैफने बचाव केला त्यामुळे त्याला जहांगीरवर हल्ला करता आला नाही.
याच दरम्यान सैफ आणि त्या हल्लेखोराची झटापट झाली. यात त्याने सैफवर अनेकदा वार केले. ज्यावेळी तो सैफवर हल्ला करत होता तेव्हा मी प्रसंग पाहून मुले आणि बाकीच्या महिलांना बाराव्या मजल्यावर पाठवून दिलं. हल्लेखोराने घरातील कोणतीही वस्तू चोरली नाही. घरातील दागिने सुरक्षित आहेत असे करिनाने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हल्ल्याच्या वेळी करिनाही प्रचंड तणावात होती. तेव्ही तिची बहीण करिश्मा कपूरने तिला तिच्या घरी घेऊन गेली. करिनाने पोलिसांना सांगितलं की दागिने समोरच पडले होते पण हल्लेखोराने त्याला हातही लावला नाही. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. त्याची ओळख पटवण्यात आली आहे. त्यानेच सैफवर हल्ला केला असावा असा दाट संशय पोलिसांना आहे. याच व्यक्तीने 11 डिसेंबर रोजी याच पद्धतीने एका ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. लोकांनी त्याला पकडलं होतं पण मनोरुग्ण असल्याचं समजून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं नव्हतं.