कॅन्सरविरोधातील लढाईसाठी तानाजी सावंतांचा ‘मास्टर प्लॅन’ : राज्यात मिळणार ‘खास’ सुविधा

कॅन्सरविरोधातील लढाईसाठी तानाजी सावंतांचा ‘मास्टर प्लॅन’ : राज्यात मिळणार ‘खास’ सुविधा

मुंबई : देशासह राज्यातील कॅन्सर रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी मास्टर प्लॅन आखला आहे. मंत्री सावंत यांनी राज्यासाठी कॅन्सर व्हॅनची (Cancer Vas) आणि जिल्हा रुग्णलयांमध्ये केमोथेरपीकरीता डे केअर सेंटरची संकल्पना मांडली आहे. यातील कॅन्सर व्हॅनसाठी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निधीचीही मागणी केली आहे, 2024-25 च्या अर्थसंकल्पात हा निधी मिळण्याची शक्यता आहे. तर केमोथेरपीकरीता डे केअर सेंटरसाठी टाटा कर्करोग रुग्णालयसोबत बोलणी सुरु असल्याची माहितीही त्यांनी दिली.

वार्षिक कार्यक्रम सन 2024-25 आखणीच्या अनुषंगाने आरोग्य विभागाची बैठक उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मंत्रालयीन दालनात आयोजित करण्यात आली. त्यावेळी मंत्री डॉ. सावंत बोलत होते. (Considering the increasing number of cancer patients in the state, Health Minister Tanaji Sawant has proposed the concept of cancer van for the state)

फुटण्यास नकार दिल्यानेच सूरज चव्हाणचा छळ; अटकेनंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

याबाबत बोलताना तानाजी सावंत म्हणाले, जागतिक आरोग्य संघटनेनुसार देशात मोठ्या प्रमाणावर कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. तसेच राज्यातही कर्करोगाच्या प्रमाणात वृद्धी होत आहे. कर्करोगाचे रूग्ण वाढण्यामागे निदान न होणे हे मोठे कारण आहे. कर्करोगाचे निदान जलद होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘कॅन्सर व्हॅन’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात ही कॅन्सर व्हॅन फिरुन कर्करोगाच्या रुग्णांचा शोध घेण्याचे काम करणार आहे. या कॅन्सर व्हॅनसाठी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निधीचीही मागणी केली आहे.

या व्यतिरिक्त केमोथेरपी उपचार सर्व जिल्हा रूग्णालयांमध्ये सुरू करण्याची योजनाही यावेळी आरोग्य मंत्री सावंत यांनी बोलून दाखविली. ते म्हणाले, राज्यातील सर्व जिल्हा  रूग्णालयांमध्ये केमोथेरपी उपचार सुरू करणे आवश्यक आहे. यासाठी टाटा कर्करोग रुग्णालयसोबत बोलणी सुरु असून ती पूर्ण होताच रुग्णालयासोबत सामजंस्य करार करून प्रत्येक जिल्हा रूग्णालयात केमोथेरपीकरीता डे केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे, असेही यावेळी त्यांनी सांगितले.

आशा सेविकांसाठीही निधीची मागणी :

यावेळी मंत्री डॉ. सावंत यांनी आशा कार्यकर्ता आणि गट प्रवर्तक यांचे कामाचे तास, जबाबदारी यांची वास्तविकता ओळखून मानधन वाढीसाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. ते म्हणाले, आशा कार्यकर्ता यांना 8 हजार रूपये व गट प्रवर्तक यांना 14 हजार रूपये मासिक मानधन देण्यात येतात. मात्र वास्तविक बाबी तपासून आशा कार्यकर्ता यांच्या असलेले काम, जबाबदाऱ्या यांचा विचार व्हावा. त्यानुसार निधीची तरतूद उपलब्ध करून द्यावी.

ठाकरेंची ‘महापत्रकार परिषद’ अन् भाजपचा जळफळाट; सूरज चव्हाणांना सुडबुद्धीने अटक : अंधारेंचे टीकास्त्र

आरोग्य विभागाकडील रूग्णालयांचे व्यवस्थापन, दुरूस्ती, नुतनीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. मात्र रूग्णालयांचे व्यवस्थापन करताना अडचणी येतात. परिणामी, नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. विभागाने बांधकाम सुरू असलेल्या रूग्णालयांचे बांधकामाच्या पुर्णतेनुसार वर्गवारी केली असून विशिष्ट कार्यपद्धती (एसओपी) तयार केली आहे.

यासोबतच मोफत उपचारामुळे वाढलेल्या रूग्णसंख्येसाठी औषध पुरवठा, प्रत्येक तालुक्यात डायलॅसीस सेंटर सुरू करणे, 102 रूग्णवाहिका सेवा, 108 रूग्णवाहिका सेवा, हिमोफिलीया उपचार केंद्र, फिरता दवाखाना, प्रत्येक जिल्ह्यात मोबाईल एक्स- रे व्हॅन, सीबीनॅट मशीन खरेदी, कुष्ठरूग्णाला पोषण आहार, जिल्हा तसेच राज्य स्तरावर अद्ययावत साथरोग नियंत्रण केंद्राची निर्मिती, हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीमची उभारणी आदींसाठी निधी तरतूदीची मागणी यावेळी करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube